जळगाव – जळगाव तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये दिनांक 15, 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेतपिके व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने मदत करण्याची मागणी करण्यात आली.
पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून ओला दुष्काळ जाहीर करण्याची, सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्याची आणि पीक विमा मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली.
अतिवृष्टीमुळे सलग तीन दिवस शेतपिकांसह घरांचे व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाने तलाठी, सर्कल, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून त्वरित पंचनामे करावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनावणे, शेतकरी नेते अशोक खंडू बडगुजर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, गुलाबराव कांबळे, डॉ. रमाकांत कदम, सचिन चौधरी, राजेंद्र पाटील, अशोक पाटील, योगेश पाटील, विजय बांदल, हनु पठाण, किरण ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


