यावल (ता. यावल) – जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे “प्रोफेशनल फोटोग्राफीचे अर्थकारण : समस्या व उपाय” या विषयावर मार्गदर्शन व व्यावसायिक संवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व फोटोग्राफर बांधव उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यावल शाखेचे व्यवस्थापक रितेश सावरकर व बिझनेस कोच दत्ता पाटील (जळगाव) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक बडगुजर, तर सूत्रसंचालन देशमुख सरांनी केले. आभार प्रदर्शन प्रफुल्ल नेहते यांनी मानले.
रितेश सावरकर यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील आर्थिक नियोजन, बँकिंग व्यवहार व शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. तसेच इन्कम टॅक्स रिटर्न व सिबिल स्कोअरचे महत्त्व त्यांनी उलगडून सांगितले. दत्ता पाटील यांनी फोटोग्राफर्सच्या आर्थिक गणितांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या समस्या व उपाय, तसेच बँकिंग क्षेत्राकडे पाहण्याचा भविष्यकालीन दृष्टिकोन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. त्यानुसार, हेमराज पाटील (स्वराज्य प्रोडक्शन) अध्यक्ष, मनोज होले व मुकेश बारी उपाध्यक्ष, तर पवन कोळी खजिनदार म्हणून निवडले गेले. तसेच शैलेश पवार, रोहिदास कोळी, देवा सपकाळे, राहुल देशमुख, महेश नन्नवरे, नितीन कोळी व मोहित सपकाळे सदस्य म्हणून निवडले गेले.


