जळगाव, प्रतिनिधी । भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट स्थापन करावे अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिल्या. जिल्हा युवा कार्यक्रम सल्लागार समितीची बैठक नुकतेच जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, जिल्हा कौशल्य विकास विभागाचे एस.बी.पाटील, एनसीसीचे नारायण पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, एनएसएसचे संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, सामाजिक कार्य अधिकारी एस.एस.भोलाणे, संजय बेलोरकर, प्रमोद बारके, रेड क्रॉसचे सचिव विनोद बियाणी, युवक मंडळ सदस्य विनोद ढगे, कार्यक्रम समन्वयक अजिंक्य गवळी, स्वयंसेवक रणजीत राजपूत आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागाकडे लक्ष द्या. अधिकाधिक उपक्रम आणि मोहीम राबवून युवक आणि मंडळांना नेहरू युवा केंद्राशी संलग्नित करा, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक करताना नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी नेहरू युवा केंद्राच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच आजपर्यंत घेतलेल्या आणि पुढे घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल सांगितले. जिल्हा युवा सल्लागार समितीच्या बैठकीत केंद्र शासनाने सुरू केलेल्या जलशक्ती अभियान – ‘कॅच द रेन’च्या भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात अधिकाधिक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केले.