सुरत, वृत्तसंस्था : अयोध्या येथे भव्य राम मंदिर निर्माणासाठी श्री रामजन्मभूमी न्यासाच्या वतीने सध्या देशभर निधी समर्पण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून शुक्रवारी सायंकाळपर्यंत श्री रामजन्म भूमी तीर्थ क्षेत्र या ट्रस्टच्या खात्यात १ हजार ५११ कोटी रुपये जमा झाले असल्याचे ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी येथे सांगितले.
अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी संपूर्ण देशभरातून निधी गोळा करण्यात येत आहे. या देणगी मोहिमेदरम्यान देशभरातील ४ लाख गावे आणि ११ कोटी कुटुंबांपर्यंत पोहचण्याचे आमचे लक्ष्य आहे. आम्ही ही मोहिम १५ जानेवारीपासून सुरु केली असून ती २७ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
४९२ वर्षानंतर लोकांना धर्मासाठी काही करण्याची संधी मिळाली आहे, असे गोविंद देव गिरी यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यासह ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला. येथील वादग्रस्त जमीन ट्रस्टच्या ताब्यात देण्याचा निर्णय दिला आणि ट्रस्टच्या माध्यमातून त्या जागेवर राम मंदिर उभारणी केली जाईल.
मशिदीसाठी ५ एकर जागा देण्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२० मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या कामावर देखरेखीसाठी श्री राम जन्म भूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेची घोषणा केली होती.
सध्या या ट्रस्टच्या देखरेखीखाली अयोध्येत राम मंदिराचे निर्माण सुरु आहे. त्यासाठी आखण्यात आलेल्या निधी समर्पण मोहिमेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. हजारो लोकांनी ट्रस्टच्या खात्यावर ऑनलाईन पैसे जमा केले आहेत.
Rs 1,511-crore has been collected for Ram Temple construction in Ayodhya, as per data available on Thursday evening: Swami Govind Dev Giri, Treasurer of Shri Ram Janmabhoomi Tirtha Kshetra (12.02.2021) pic.twitter.com/OYQG5MJBKu
— ANI (@ANI) February 13, 2021