मुंबई, वृत्तसंस्था – परळीतील तरूणीने पुण्यात आत्महत्या केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे, ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती, परंतु रविवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून तिनं आत्महत्या केली, मात्र ही आत्महत्या आहे की तिला कोणी मारलं? असा प्रश्न भाजपा महिला आघाडीने उपस्थित करून या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं, या २२ वर्षीय तरूणीचे ठाकरे सरकारमधील कथित मंत्र्यांसोबत प्रेमसंबंध होते, त्यातून तिने आत्महत्या केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
या संपूर्ण प्रकरणात विरोधी पक्ष भाजपाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे, यातच भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही पहिल्यांदाच या प्रकरणात भाष्य केले आहे. पंकजा मुंडे यांनी यावर ट्विट करत म्हटलंय की, पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. या तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
कोण आहे पूजा चव्हाण?
पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंगबाज होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास तिने गॅलरीतून उडी टाकली. तिच्या डोक्याला व मणक्याला गंभीर दुखापत झाली. विलास व अरुण यांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने तिचा मृत्यू झाला.
मोबाईल, लॅपटॉपमध्ये अनेक आक्षेपार्ह गोष्टी
आत्महत्या केलेल्या मुलीच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह माहिती सापडली आहे. पोलिसांनी तिचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला आहे. त्यामध्ये काय आहे हे पोलिसांनी जाहीर करावे, नाहीतर दोन-तीन दिवसांत याची माहिती बाहेर येईलच असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
ऑडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या कथित मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे. कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले असं म्हटलं जात आहे.