नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशाच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडणाऱ्या भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या जीविताला मोठा धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद अजित डोवाल यांना मारण्यासाठी प्लॅन तयार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जैशच्या दहशतवाद्याच्या चौकशीतून, सरदार पटेल भवन आणि राजधानी दिल्लीतील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर एनएसए अजित डोवाल यांचे कार्यालय आणि घराभोवती सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सरदार पटेल भवनमध्ये अजित डोवाल यांचे कार्यालय आहे.पाकिस्तानमधील हँडलरच्या सांगण्यावरुन हे सर्व केल्याचे जैशच्या दहशतवाद्याने सांगितले.
२०१६ उरी सर्जिकल स्ट्राइक त्यानंतर २०१९ मधील बालाकोट एअर स्ट्राइकपासूनच अजित डोवाल पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर आहेत. उरी आणि बालाकोट दोन्ही स्ट्राइकमध्ये डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. गुप्तचर संस्थांमध्ये काम करताना भारतासाठी वेगवेगळया हेरगिरीच्या मोहिमा पार पाडणाऱ्या डोवाल यांच्याबद्दल अनेकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.
एनएसए डोवाल यांना जीवाला धोक आहे. त्या बद्दल सुरक्षा यंत्रणा आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सूचित करण्यात आले आहे असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी सांगितले. जैशचा दहशतवादी हिदायत-उल्लाह मलिक याच्या चौकशीतून डोवाल यांच्या कार्यालय परिसराची व्हिडिओच्या माध्यमातून टेहळणी करण्यात आल्याची माहिती समोर आली.
हिदायत-उल्लाह मलिक शोपियनचा रहिवाशी आहे. त्याला सहा फेब्रुवारीला अटक करण्यात आली. जम्मूच्या गानग्याल पोलीस ठाण्यात मलिक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. जैशच्याच लष्कर-ए-मुस्तफाचा तो प्रमुख आहे. त्याला अनंतनागमधून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे शस्त्रास्त्र आणि दारुगोळयाचा साठा सापडला होता.