जळगाव – माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या सोबत त्यांनी बंदद्वार चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.
गत महापालिका निवडणुकीत एकनाथराव खडसे यांच्या समर्थकांना मोजकी तिकिटे देण्यात आली होती. तसेच त्यांना पध्दतशीरपणे पराभूत करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकही नगरसेवक निवडून गेला नव्हता. आता मात्र एकनाथराव खडसे यांच्या सारख्या मातब्बर नेत्याचे राष्ट्रवादीत आगमन झाले असल्याने महापालिकेतील सत्ताकारणात बदल होण्याचे संकेत मिळाले आहेत. याचीच प्रचिती आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी खडसे यांच्या घेतलेल्या भेटीतून आली आहे.
खडसे यांच्या निवासस्थानी आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी त्यांची भेट घेऊन बंदद्वार चर्चा केली. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी नाथाभाऊंनी महापालिकेतील काही वादग्रस्त विषयांची माहिती जाणून घेतल्याचे समजते. यामुळे खडसेंचे मिशन महापालिका सुरू झाल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
अजून वाचा
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता