जळगाव – विकासात्मक कामांसाठी शासन नेहमीच पाठीशी असून विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. चोपडा तालुक्याचे सिंचन क्षेत्र वाढण्यासाठी वरदान ठरणाऱ्या पाडळसरे प्रकल्पाच्या कामाला गती देऊन सिंचनाचा प्रश्न सोडवला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज चोपडा येथे काढले.
चोपडा नगरपालिकेने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतंर्गत पाटीलगढी पुलाजवळ उभारलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी, आमदार लता सोनवणे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार मनीष जैन, नगराध्यक्षा मनीषा चौधरी, ॲड. रवींद्र पाटील, हाजी गफ्फार मलिक, घनश्याम अग्रवाल, पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, राजाराम पाटील, नगरपालिकेचे गटनेते जीवन चौधरी, विरोधी पक्षनेते महेश पवार, माजी जि. प. अध्यक्ष छन्नू झेंडु पाटील, प्रांताधिकारी सुमित शिंदे, तहसीलदार छगन वाघ आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अरुणभाई गुजराथी यांनी नगरपरिषदेने उभारलेल्या या भव्य आणि देखण्या वास्तूचे कौतुक केले. तसेच गतकाळात आणि आताच्या काळात अनेक स्थित्यंतरे झाली. सेवा सुविधा वाढल्या तसेच प्रश्न बदलले त्याप्रमाणे गरजाही वाढल्या आणि त्या पुरवण्याचा नगरपालिका सातत्याने पाठपुरावा करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तालुक्यातील मेगा रिचार्ज, साखर कारखाना, पुर कालवा आदी प्रश्नांसंदर्भात जलसंपदामंत्र्यांकडे निधीची मागणी केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गफ्फार मलिक यांनी आपल्या मनोगतातून अल्पसंख्यांक वस्तीमध्ये भव्य वास्तू उभारून नगरपालिकेने खूप मोलाचे काम केले असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन नगरपरिषदेचे कौतुकही केले. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन ॲड. घनश्याम पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारी यांनी, प्रास्ताविक मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी तर आभार प्रदर्शन गटनेते जीवन चौधरी यांनी केले. कार्यक्रमास नगरपालिकेचे नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते