मुंबई – मागील अनेक दिवसांपासून लागलेला सस्पेन्स संपवत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला असून आहे. अर्थात, या माध्यमातून त्यांनी भाजपला राम राम ठोकला आहे .
भाजपचे ज्येष्ठ मातब्बर नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. २०१६ साली लागोपाठ काही दिवसांमध्ये आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्यानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर पक्षाने त्यांचे पुनर्वसन तर केले नाहीच, पक्ष सातत्याने त्यांची उपेक्षा केली. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकिट नाकारून त्यांच्या मुलीस तिकिट देण्यात आले. मात्र त्यांच्या पराभव झाल्याने खडसे संतप्त झाले असून त्यांनी सातत्याने पक्षावर टीका केली होती.
मागील दोन महिन्यांपासून एकनाथराव खडसे हे पक्षांतर करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली होती. काही दिवसांपूर्वी यासाठी शरद पवार यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील नेत्यांचे मत जाणून घेतले होते. यानंतर त्यांना शिवसेनेनेही ऑफर दिल्याची चर्चा होती. अर्थात, खडसे हे पक्ष बदलणार…मात्र ते नेमके कुठे जाणार याबाबतची माहिती समोर आली नव्हती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील कार्यालयात आज एकनाथराव खडसे यांनी पक्षात प्रवेश घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील तमाम मंत्री आणि ज्येष्ठ नेते उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातील आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, संजय गरुड, हाजी गफ्फार मलिक, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार संतोष चौधरी आदी नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते.
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, गेल्या 40 वर्षांपासून एकनाथराव खडसे यांनी भारतीय जनता पक्ष वाढवला. त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठे केले. आमचा राजकीय विरोध असला तरी मनात कधीही कटुता नव्हती खडसे यांच्या आगमनाने जिल्ह्यात उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी मजबूत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अजून वाचा
Breaking: एकनाथराव खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेशच्या वेळेत बदल