नवी दिल्ली – देशातील सहा ठिकाणी बायो बबल केंद्र तयार करून येत्या डीसेंबर महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीत देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा घेण्याचा विचार बीसीसीआयने व्यक्त केला आहे. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांचा आराखडा बीसीसीआयकडून जाहीर केला आहे. याबाबतचा सविस्तार आराखडाही तयार करण्यात आली असून येत्या काही दिवसांत सर्व संलग्न संघटनांच्या होकारानंतरच तो अधिकृतरीत्या बीसीसीआयकडून जाहीर केला जाणार आहे.
करोनाचा धोका सुरू झाल्यानंतर जागतिक स्तराबरोबरच देशांतर्गत स्पर्धाही ठप्प झाल्या होत्या. आता अमिरातीत पार पडलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात मालिका खेळत आहे. तसेच भारतातील करोनाची परिस्थिती आता सुधारत असून काही राज्यांमध्ये तर त्याचे अस्तित्वही संपूष्टात आले आहे. त्यामुळेच येत्या डिसेंबर महिन्यापासून देशांतर्गत स्पर्धांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. आता संलग्न राज्य संघटनांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला तर चार महिन्यांच्या कालावधीत रणजी स्पर्धेसह बीसीसीआयच्या मानाच्या सर्व स्पर्धा घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी देशातील करोनाचा धोका जवळपास संपूष्टात आलेल्या सहा राज्यांतील केंद्रांवर बायो बबल सुरक्षा पुरवली जाणार आहे, असेही बीसीसीआयने सांगितले आहे.
दरवर्षी देशांतर्गत स्पर्धेला प्रारंभ होत असलेली सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा येत्या 20 डिसेंबरपासून तर, सर्वात मानाची समजली जात असलेली रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा 11 जानेवारीपासून सुरू करण्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.
रणजी स्पर्धा 11 जानेवारी ते 18 मार्च 2021 या 67 दिवसांच्या कालावधीत घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुश्ताक अली स्पर्धा 20 डिसेंबर ते 10 जानेवारी 2021 या 22 दिवसांत तर, विजय हजारे स्पर्धा 11 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2021 या 28 दिवसांत आयोजित केली जाईल.
करोनाच्या काळात देशांतर्गत क्रिकेटचे वेळापत्रक तयार करताना खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय पथके सज्ज केली जाणार आहेत. सहा ठिकाणी बायो बबल केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. तसेच या प्रत्येक केंद्रांत किमान तिन मैदाने निश्चित केली जातील.
अजून वाचा
आता डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या; सविस्तर वाचा