अक्कलकोट: गेल्या ८ महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मंदिरं आजपासून सुरु झाली आहेत. ‘ही श्रींची इच्छा’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अक्कलकोट इथलं स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. स्वामींचे राज्यभरात लाखो भक्त आहेत. आज दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर स्वामींचे भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी दाखल झाले आहेत. जवळपास 8 महिन्यांनंतर झालेल्या दर्शनामुळं भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याचं चित्र इथं पाहायला मिळालं.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर आजपासून राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्यात आली आहेत. अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिरंही आजपासून भाविकांसाठी उघडं करण्यात आलं. आठ महिन्यांपासून स्वामींच्या दर्शनासाठी आतुर झालेल्या भाविकांनी आज पहाटेपासूनच स्वामींच्या चरणी लीन होण्यासाठी रांगा लावल्या होता. मंदिर उघडण्यात आल्यावर स्थानिक नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांनी स्वामींचं दर्शन घेत समाधान आणि आनंद व्यक्त केला.
शिर्डीतील साई मंदिरात 6 हजार भाविकांना दर्शनाची सोय
शिर्डीतील साईमंदिरात दररोज 6 हजार भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. ज्या भाविकांनी दर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करुन ठेवलेले आहे, त्यांनीच शिर्डीत यावे असे आवाहनदेखील साईबाबा संस्थानतर्फे करण्यात आले आहे.
तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाइन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.
विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग
विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागणार आहे. पंढरपूरात दररोज एक हजार भाविकांना दर्शन दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 65 वर्षावरील आणि 10 वर्षापर्यंतच्या मुलांना दर्शनास बंदी घालण्यात आली आहे. नित्योपचाराचा वेळ वगळता उरलेल्या वेळात दर एक तासाला शंभर लोकांना मंदिरात दर्शनासाठी प्रवास देण्यात येईल असा निर्णय मंदिर प्रशानसनाकडून घेण्यात आला आहे.
अजून वाचा
Breaking: सोमवारपासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडणार