पाटणा – राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या आमदारांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदी जनता दल (संयुक्त)चे नेते नितीशकुमार यांची बिनविरोध निवड केली. मी मुख्यमंत्री बनण्यासाठी फारसा उत्सुक नव्हतो. मात्र, भाजपाच्या विनंतीवरून मी ही जबाबदारी स्वीकारली आहे, अशी प्रतिक्रिया नितीशकुमार यांनी व्यक्त केली. ते आज सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. जनता दल (सं) आणि भारतीय जनता पक्षाने नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्री बनवले जाईल, असा संयुक्त प्रचार केला होता. त्यामुळे नितीशकुमार यांच्या वक्तव्याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
अवघ्या 40 जागा पटकावून केवळ भाजपाच्या पाठींब्यावर जनतेने नाकारलेला नेता मुख्यमंत्री होत आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने भलेही बहुमत मिळवले असेल मात्र, लोकांच्या हृदयावर आम्हीच राज्य करतो. नितीश यांनी सारासार विचार गमावला आहे, असेही ते म्हणाले होते.
मला यावेळी भारतीय जनता पक्षातून कोणीतरी मुख्यमंत्री व्हावे, असे वाटत होते. मात्र भाजपच्या विनंतीवरून मी मुख्यमंत्री बनण्याची मानसिकता तयार केली, असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रालोआमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची बैठक झाली. त्यात मुख्यमंत्रीपदी नितीश यांनाच संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांना केंद्रात स्थान देण्यात येणार असून उपमुख्यमंत्रीपदाची संधी कटीहारचे आमदार ताराकिशोर प्रसाद यांना देण्यात येईल.
नितीशकुमार आज दुपारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गेल्या दोन दशकांत ते सातव्यांदा मुख्यमंत्री बनतील. दुपारी चार साडेचार वाजण्याच्या दरम्यान त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
या विधानसभेत भाजप प्रथमच मोठ्या भावाच्या रूपात समोर आला आहे. भाजपकडे 74 आमदार असून जदसंकडे केवळ 43 आमदार आहेत. हम आणि व्हिप या पक्षांना प्रत्येकी चार जागा मिळाल्या आहेत. त्यांना मंत्रीमंडळात स्थान द्यावे लागणार आहे. कारण त्यांच्या पाठींब्यावरच रालोआने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे मंत्रीपदाचे वाटप कसे करणार? हा औत्सुक्याचा विषय असणार आहे.
अजून वाचा
नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री