जळगाव – शहरातील महामार्ग परिसरात वाढत्या अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नगरसेविका जयश्री राहुल पाटील यांनी नॅशनल हायवे प्रकल्प अधिकाऱ्यांकडे महत्त्वाची मागणी केली आहे.
दि. १६ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात त्यांनी मानराज पार्क स्टॉप ते खोटेनगर दरम्यान असलेल्या पूल व सर्विस रोड यांना विभागणाऱ्या कठड्यावर वारंवार वाहने चढत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली.
तसेच मानराज पार्क स्टॉप ते शिव कॉलनी स्टॉप दरम्यान, विशेषतः रेल्वे पुलाजवळील कठड्यावर देखील अशीच परिस्थिती निर्माण होत असून, वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात घडण्याची शक्यता अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी तातडीने दिशा दर्शक फलक व रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी करण्यात आली आहे. योग्य उपाययोजना केल्यास दुभाजकावर होणारे अपघात मोठ्या प्रमाणात टाळता येतील, असा विश्वास नगरसेविका पाटील यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


