जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. २७ ऑगस्ट २०२४ ला शिवतीर्थ मैदान जळगाव येथे सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान तरूणींचा दहिहंडी महोत्सव आयोजित केला आहे. यामध्ये नुतन मराठा महाविद्यालय, ॲड. एस. ए. बाहेती महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, एन. सी. सी., के. सी. ई. मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूल, किड्स गुरूकूल इंटरनॅशनल शाळा, जी. आय. रायसोनी महाविद्यालय, एकलव्य क्रीडा संकुल असे एकूण आठ महिलांचे गोविंदा पथक सहभागी होणार आहेत. यामध्ये एकुण ४२३ तरूणींचा समावेश आहे. यासह शौर्यवीर व पेशवा ढोल-ताशा पथकाचे ३११ वादक वादन करणार आहेत.
विवेकानंद व्यायाम शाळेचे विद्यार्थी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक देणार आहेत. प्रशिक्षक नरेंद्र भोई यांच्या मार्गदर्शनात २७ मुली मल्लखांब व रोपमल्लखांबचे चित्तथरारक प्रात्यक्षिक करणार आहेत. यासह लेझर शो, आधुनिक लाईट शोचे सादरीकरण होणार आहे. ५ ते १२ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी श्रीकृष्ण-राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
क्रेनच्या सहाय्याने आठ दहिहंड्या उभारण्यात येणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हा एकमेव तरूणींचा दहिहंडी महोत्सव आहे ज्या दहिहंडी फोडण्याचा मान फक्त आणि फक्त महिला गोविंदा पथकांना देण्यात येतो. दहिहंडी सारख्या साहसी खेळात महिलांचा सहभाग वाढावा हा या आयोजनामागील उद्देश आहे. आयोजनाचे हे १६ वे वर्ष असून जळगावकर नागरिकांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया यांनी केले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व बालगोपालांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. असे युवाशक्ती फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष प्रितम शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.