जळगाव – वाकोद येथील गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा जणांची पोलीस दलासाठी स्तुत्य निवड झालेली आहे. जळगाव पोलीससाठी रितेश पाटील, कल्पेश मोहने यांची, गजानन मगर यांची धाराशिव पोलीस दलात, वाकोद येथील तुषार पांढरे, अभय पांढरे यांची पुणे एसआरपीएफ तर भूषण पाटील दौंड एसआरपीएफ पोलीस दलासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले.
शिपाई, एम.पी.एस.सी. युपीएस.सी, ग्रामसेवक, कृषिसेवक, आरोग्यं सेवक इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक, पुस्तके व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या गोष्टीचा लाभ या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. केवळ सहा महिन्यांमध्ये सुरू झालेल्या या गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे यश म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया अतुल जैन यांनी व्यक्त केली. हे केंद्र सुरू करण्यासाठी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व अतुल जैन यांची प्रेरणा लाभलेली आहे.
कुठलीही व्यक्ती असो ती व्यक्ती जन्माला आली की ऋणी बनते. त्यात मातृऋण, पितृऋण, गुरुऋण आणि मातृभूमीचे ऋण असते. मातृभूमीचे ऋण तर सर्वात मोठे असते त्याच ऋणाची उतराई होण्यासाठी जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन आणि जैन परिवार वाकोद गावासाठी ग्राम विकासाचे काम वा तत्सम गोष्टी, कल्याणाचे काम करत आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका म्हणता येईल. अथक परिश्रम आणि अभ्यासाच्या जोरावर या केंद्रातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पोलीस दलाच्या निवड चाचण्या व परीक्षा झाल्या. पोलीस भरती सराव परीक्षेचे, शारीरीक क्षमतेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गौराई स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या सहा उमेदवारांनी आपल्या बौध्दीक व शारीरीक कौशल्याची चुणूक दाखविली आहे. रितेश पाटील (१५० पैकी १३९), कल्पेश मोहने (१५० पैकी १३८), गजानन मगर (१५० पैकी १३०), तुषार पांढरे (२०० पैकी १८३) आणि अभय पांढरे (२०० पैकी १९०) भूषण पाटील (२०० पैकी १८६) असे गुण प्राप्त केले आहेत.
२६ जानेवारी २०२४ ला स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांचे शिबीर घेण्यात आले त्यात प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पवार साहेब आले होते. त्याच कार्यक्रमात या केंद्राचे अनौपचारिकपणे उद्घाटन झाले. या केंद्राचे प्रमुख जयदीप पाटील असून समन्वयक म्हणून पल्लवी पाटील काम पाहत आहेत. सहा महिन्यांच्या कालावधीत विविध विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील ठेवण्यात आले होते. त्यात अशोक बाविस्कर (मराठी व्याकरण), देवल पाटील (सामान्य अध्ययन), अक्षय देवरे (पॉलीटिकल सायन्स), जयदीप पाटील (अंकगणित), देवलसिंग पाटील (जनरल नॉलेज) आणि दिलीप पाटील यांनी सर्वसमावेशक विषयांवर मार्गदर्शन केले. या केंद्रामध्ये भविष्यात युपीएससी, एमपीएससी बाबत पुस्तके उपलब्धते सोबतच तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील उपलब्ध करण्यात येणार आहे.