नवी दिल्ली/ जळगाव, – जळगाव शहरातील महामार्ग क्र. ५३ चा पाळधी ते तरसोद या महामार्गादरम्यानचा जळगाव शहरातील बांभोरी ते गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग चौपदरी पुर्णत: कॉन्क्रीटचा करावा. त्यानंतर तो शहराच्या संबंधीत यंत्रणेकडे हस्तांतरीत करावा. तसेच या महामार्गावर बांभोरीजवळ गिरणा नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी प्रकल्प अहवाल तातडीने तयार करुन सादर करावा; अशा सूचना केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या संबंधित यंत्रणेस दि. २७ ऑगस्टला दिल्यात. नितीन गडकरी यांनी जळगाव येथील मान्यवर नागरिकांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करून रस्त्यांचे विविध प्रस्ताव मान्य करण्यासंदर्भात सहमती दर्शविली आहे. जळगाव येथील नागरिकांचे हे शिष्टमंडळ जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या नेतृत्त्वात नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी गेले होते.
दरम्यान अतुल जैन यांनी जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांच्या संपर्क करून शिष्टमंडळ व नितीन गडकरी यांच्यातील झालेल्या चर्चेची माहिती दिली.तसेच खासदार स्मिता वाघ यांची आज नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक असून जळगाव संदर्भातील महामार्गाच्या विविध विषयांवर धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्रित येऊन शहर विकासाच्या विषयांचा पाठपुरावा करण्यासाठी जळगाव नागरिक मंच स्थापन केला आहे. या मंचने ज्येष्ठ पत्रकार तथा एनएचईपीचे संचालक उदय निरगूडकर यांच्या माध्यमातून नितीन गडकरी यांच्या प्रत्यक्ष भेटी संदर्भात विनंती केली होती. त्यानंतर जळगाव शहरातील महामार्गाशी संबंधीत समस्यांचे सविस्तर टिपण अशोक जैन यांच्या मार्गदर्शनात तयार करून उदय निरगुडकर यांच्याकडे पाठविले होते. त्यांच्या मध्यस्थीने नितीन गडकरींची भेटीची वेळ निश्चित झाली. या अनुषंगाने अतुल जैन यांनी जळगावच्या शिष्टमंडळासह दि. २७ ऑगस्टला नवी दिल्लीत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
जळगावच्या शिष्टमंडळात क्रेडाई संघटनेच्या राज्य शाखेचे उपाध्यक्ष अनिष शहा, कोगटा उद्योग समूहाचे संचालक प्रेम कोगटा, स्पेक्ट्रम इलेक्ट्रीकल्स लिमिटेडचे अध्यक्ष दीपक चौधरी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, मल्टिमीडिया फीचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सुशील नवाल, पत्रकार दिलीप तिवारी यांचा समावेश होता.
अतुल जैन यांच्यासह शिष्टमंडळातील इतरांनी नितीन गडकरी यांना जळगाव शहरातील महामार्गाची सध्याची दुरावस्था, त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, वाढलेल्या अपघातांची संख्या आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या जळगाव प्रकल्प अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली. महामार्ग चौपदरीकरणाचे सध्यस्तिथीतील रेंगाळलेले काम धुळे, पाळधी, तरसोद या ठिकाणी थांबलेले वळण महामार्गाचे काम, तसेच गिरणा नदीवरील प्रस्तावित पुलाचे न सुरू झालेले बांधकाम या विषयी वस्तुस्थिती दर्शक माहिती दिली. अतुल जैन यांनी नितीन गडकरी यांना आग्रह केला की, ‘जळगाव शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटकरण करताना ते थेट पाळधी बायपास ते तरसोद बायपास असे शहरातून करावे. हे काम करताना बांभोरी जवळ गिरणा नदीवर नवा पूलाचे बांधकाम करावे.’ यावर नितीन गडकरी ही म्हणाले की, ‘जळगावची ही गंभीर समस्या मला माहिती आहे त्यामुळे शहरातील महामार्गाचे क्रॉन्क्रीटीकरण नक्कीच करु तसेच नव्या पुलाच्या बांधकामासाठी कार्यवाही करु.’ हे सांगत असतानाच नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना मोबाईल वर कॉल करुन योग्य त्या सूचना दिल्यात.