जळगाव – ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी अमृतकर यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी झाली त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, शहरातील साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक जैन इरिगेशनचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आरंभी तुळशीचे रोप व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन केले गेले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त निष्णात हृदयरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गायिका मनिषा कोल्हे यांनी ‘बहिणाबाईंच्या माझी माय सरसोती…’ या गाण्याचे सुश्राव्य संगीतासह नेहमीपेक्षा वेगळ्या चालीचे गीत सादर केले. शीतल पाटील यांनी ‘संकटाले देऊ मात..’ ही स्वतःची कविता सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजीडीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी देखील बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. यात प्राजक्ता ढगे, नेहा पावरा, गायत्री कदम यांचा सहभाग होता. शानभाग विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे, जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन, सौ. प्रज्ञा नांदेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
“माह्यी माय सरसोती!” पुस्तक प्रदर्शन
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित “माह्यी माय सरसोती!” पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. ज्या पत्री पेटीत सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाई चौधरीच्या कविता ठेवल्या होत्या त्या पेटीतून पाच निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांनी बहिणाबाईंचे पुस्तक बाहेर काढावे अशी जैन इरिगेशनचे ग्रंथपाल व चौधरी परिवारातील अशोक चौधरी यांची आगळी वेगळी संकल्पना होती. यात स्मिता चौधरी (चौधरी परिवारातील सदस्य), कामिनी अमृतकर (शिक्षिका), सौ. मनिषा कोल्हे (गायिका), शीतल शांताराम पाटील (साहित्यीक) आणि प्रिया चौधरी (गृहिणी) यांचा समावेश होता. आर. आर. शाळेतील कला शिक्षक स्व. सुधाकर संधानशिवे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारीत ९ ग्रंथांचे मुखपृष्ठ साकारले, त्यांच्या पुस्तकांचा संच त्यांचे सुपुत्र क्रियेटीव्ह आर्टिस्ट योगेश संधानशिवे यांनी बहिणाई स्मृति ग्रंथालयास सस्नेह भेट दिले. त्यांचा सत्कार विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक अशोक चौधरी, प्रदीप पाटील, सुभाष भंगाळे, ज्ञानेश्वर सोनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, विजय लुल्हे त्याच प्रमाणे कैलास चौधरी, दिलीप चौधरी, प्रिया चौधरी, काजल चौधरी, कविता चौधरी, नीलिमा चौधरी समस्त चौधरी वाड्यातील सदस्य उपस्थित होते.