जळगाव – ‘कर्म हेचि जीवन’ मानणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलाल जैन अर्थात मोठेभाऊ यांचा आज ता. २५ फेब्रुवारी श्रद्धावंदन दिन निमित्त अनुभूती निवासी स्कूलच्या वतीने ‘भक्ती संगीत संध्येतून मोठ्याभाऊंच्या गुणसंपदेचे प्रेरणादायी स्मरण करण्यात आले.
भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या सहकार्यातून संजीवनी फाऊंडेशन व परिवर्तनतर्फे आयोजित सहा दिवसीय मैत्र महोत्सवाचा आज दुसरा दिवस होता. भाऊंच्या उद्यानातील एम्फी थिएटर मध्ये सुरू असलेल्या या महोत्सवात आज अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी गितार, तबला, बासरी, किबोर्डसह इतर वाद्यांच्या साथ संगतीने गायनातून दादाजींच्या जगण्याचे सार्थकत्व अधोरेखित केले.
याप्रसंगी प्रमूख अतिथी म्हणून अनुभूती स्कूलचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, सौ. ज्योती जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, डाॕ. भावना जैन, सुनिता भंडारी उपस्थित होते. महोत्सव प्रमुख अनिल कांकरिया, स्वरूप लूंकड, पारस राका, नारायण बाविस्कर उपस्थित होते. श्रध्देय भवरलाल जैन यांना श्रध्दांजली अर्पण करून स्वरानुभूतिची सुरवात झाली. सुत्रसंचालन अनुष्का महाजन, नमित जैन यांनी केले.
तबला सोलोची जुगलबंदी
अनुभूतीच्या विद्यार्थ्यांसाठी दादाजींचं प्रेम मोठ्याभाऊंनी दिलं. त्याच आत्मियेतून अनुभूती निवासी स्कूल च्या विद्यार्थ्यांनी ‘भक्ती संगीत संध्या’ प्रस्तुत केले. तबला वादनामध्ये तीन ताल मध्ये उठान, कायदा, रेला, तुकडा, चक्रधर प्रस्तुत केले. तिन ताल मध्ये ठाठ, आमद, टुकडे आणि लडी सादर केले. यानंतर तीन ताल मध्ये लखनौ घराण्याच्या कथ्थक नृत्याने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले. ‘हे राम अच्यूत्तम केशवा..’ ने आनंदाची अनुभूती करून दिली. मोठेभाऊंचे पाणी, माती यासह सृष्टीसंवर्धनाचे कार्याचे स्मरण करत, विठु माऊली तु माऊली जगाची… राधा राणी लागे.. खेळ मांडला.. मोह लागे लगन.. वृक्षवल्ली आम्हां सोयरे.. मिठा क्रिष्णा नाम है.. अशी गीत गायली. औपचारिक शिक्षणासोबतच अनुभवाधारित व भारतीय संस्कृतीची संस्कारमूल्यं रूजविणाऱ्या अनुभूती निवासी स्कूलद्वारा संपन्न झालेल्या भक्ती संगीत संध्येला जळगावकरांनी भरभरून दाद दिली. तबला गुरू अमृतेश शांडिलय, गायन गुरू आकाश बिस्वाल, कथ्थक गुरू सोनम शांडिलय यांनी अनुभूतीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.