जळगाव – एचआयव्ही बाधितांचे मतदार यादीत नाव असल्याची खात्री प्रशासन करत आहे. प्रत्येकाला अन्नधान्याच्या रूपाने वेळेवर रेशन सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. एचआयव्ही बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रशासन कटीबध्द असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. अशी ग्वाही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद Collector Ayush Prasad यांनी आज येथे दिली.
सेवारथ परिवाराच्या वतीने एचआयव्ही बाधित बालक, महिला व पुरूषांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकस आहाराचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सेवारथ परिवाराचे दिलीप गांधी, डॉ नीलिमा सेठीया, डॉ रितेश पाटील, नयनतारा बाफना आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, एचआयव्ही बाधितांनी संकटात खचून न जाता धीरोदात्तपणे आजाराचा सामना केला पाहिजे. आरोग्यमय जीवनशैलीचा अंगीकार केला तर एचआयव्ही पॉझिटिव्ह निरोगी माणसासारखे आयुष्य जगू शकतात. संकटात शासन आणि सामाजिक संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. मात्र आपण स्वावलंबी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यात आपल्याला नक्कीच यश मिळेल. असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.प्रसाद यांनी यावेळी व्यक्त केला.
श्री.प्रसाद म्हणाले, एचआयव्ही बाधितांना सामाजिक भेदभावाचा करावा लागणारा सामना अत्यंत वेदनादायी आहे. भेदभाव करणाऱ्यांचे समूपदेशन करण्याची गरज आहे. एचआयव्ही बाधितांना समाजाच्या आधार व काळजीची गरज आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोस्ना रायसोनी, रमेश मुनोत, डॉ रेखा महाजन , संगीता श्रीश्रीमाळ, आर.एन.कुलकर्णी, चंद्रशेखर नेवे, मनीषा पाटील, योगिता बाविस्कर यांनी परिश्रम घेतले.
वंदना पवार यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप गांधी आणि डॉ.नीलिमा सेठीया यांनी सेवारत संस्थेच्या कार्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली