जळगाव –राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची दि. ५ रोजी दुपारी २ वा. सागरपार्क मैदानावर स्वाभिमान सभा होणार आहे. ही सभा जोरदार व्हावी यासाठी आमदार रोहीत पवार हे उद्या दि. २ पासून जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. दरम्यान तालुकानिहाय बैठका सुरू असून सभेसाठी सुक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही दोन गट पडली. या दोन गटानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्यभरात दौरे करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केले त्या जिल्ह्यांमध्ये खा. शरद पवार यांची स्वाभिमान सभा होत आहे. येवला, बीड, कोल्हापूरनंतर खा. शरद पवार यांची जळगाव येथे दि. ५ रोजी दुपारी २ वा. सागर पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे. ही सभा दणक्यात व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार हे उद्या दि. २ पासून जळगाव जिल्ह्यात तळ ठोकून बसणार आहेत. उद्या २ रोजी आमदार रोहीत पवार यांचे महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगावात आगमन होणार असल्याची माहिती राकॉं जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच आमदार रोहीत पवार हे मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, जळगाव येथील मेहरूण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच खा. शरद पवार यांच्या सभेच्या नियोजनाविषयी देखिल ते आढावा घेणार आहेत.
दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरणार
जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. पाऊस नसल्याने शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असूनही शेतकर्यांकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आम्ही खा. शरद पवार यांच्याकडे करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली. तसेच आठ दिवसात याबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास जिल्हास्तरावर रस्त्यावर उतरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करेल असा इशाराही ऍड. पाटील यांनी दिला. तसेच जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढील आठवड्यात दौरा प्रस्तावित आहे. ते आल्यास त्यांच्यासमोर राष्ट्रवादी आंदोलन करेल असेही त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेस महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, रिकु चौधरी, मजहर पठाण, संजय चव्हाण, संदीप पाटील, अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
असा राहील खा. पवारांचा दौरा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे दि. ५ रोजी सकाळी १० वा. जळगाव येथे विमानाने आगमन होणार आहे. तेथून ते जैन हिल्सकडे रवाना होणार असून दु. २ वा. सागर पार्क येथे स्वाभिमान सभेला संबोधित करणार आहेत. सायंकाळी ५ वा. खा. पवार हे मुंबईकडे विमानाने प्रयाण करणार असल्याची माहिती ऍड. रवींद्र पाटील यांनी दिली.


