जळगाव – जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील श्री गणपती मंदिर देवस्थान, पद्मालय तीर्थस्थळांस ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत नुकतेच राज्यशासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्याचे जाहिर करण्यात आले आहे. मराठी नववर्षाच्या दुसऱ्याच दिवशी (दि.२३ मार्च) झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.
श्री गणपती मंदिर देवस्थान पद्मालय येथे एकाच व्यासपीठावर डाव्या आणि उजव्या सोंडेचे स्वयंभू दोन गणेशजी विराजमान आहेत. अमोद आणि प्रमोद असे त्यांना संबोधले जाते. खान्देशासह महाराष्ट्राभरातून भाविकभक्त याठिकाणी श्रद्धेने येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील नागरीकांची मागणी होती. जिल्ह्याच्यादृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या पद्मालय देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ दर्जामुळे करता येईल.
पद्मालय मंदिर भारतातील अडीच गणपती पिठांमध्ये एक आहे. हे मंदिर अर्धा पीठ म्हणून सन्मानीत आहे. मंदिरामध्ये दोन स्वयंभू दोन गणेश मूर्ती आहेत. एकाच व्यासपीठावर उजव्या आणि डाव्या दोघी सोंडेची गणपती मुर्ती विराजीत असून, जगातील हे एकमेव असे मंदिर आह पद्मालय हा शब्द पद्म आणि आलय या दोन शब्दांचा मिलाफ आहे ज्या संस्कृतमध्ये कमळाचे घर असा अर्थ आहे. या मंदिराच्या जवळील तलाव कायम कमळाच्या फुलांनी भरलेला असतो. त्यामुळे मंदिराला पद्मालय असे म्हटले जाते. येथील तलावात सप्तरंगी कमळ आहेत. हे मंदिर पुरातन असून मंदिराच्या संपूर्ण बांधकामाची रचना हेमाडपंथी आहे. मंदिरात एकाच व्यासपीठावर डाव्या उजव्या सोंडेचे गणपती आहे.
जगात केवळ पद्मालय येथे श्रींच्या दोन मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या दोन्ही मूर्तींमध्ये प्रवाळ आहेत आणि त्यांच्या उजव्या कवटीचे त्रिशंकण उजवीकडे आहे आणि दुसरा एक डाव्या बाजूला आहे. दोन्ही मूर्ती स्वयंभू आहेत हे मंदिर दगडांच्या आतील बाजूस बनले आहे. सद्गुरू गोविंद शास्त्री महाराज बर्वे यांना रिद्धी सिद्धी प्राप्त झाली होती त्यामुळे या मंदिराचा जिर्नोद्धार त्यांनी केला असून, गणेश पूराणात या गणपती मंदिराचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. काशी ईश्वेश्वर येथील शंकराच्या मंदिराच्या प्रतिकृती प्रमाणे या मंदिराची निर्मीती असल्याचेही सांगण्यात येते. येथे ४४० कि.ग्रा. वजनाचा एक भला मोठा घंटा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठे जाते आहे. याच परिसरात भिमकुंडही आहे.
सदर देवस्थानास ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी सर्वपरीने प्रयत्न सुरू होते. आणि त्यास अखेर यश येऊन ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे. याकामी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीष महाजन, एरंडोल-पारोळा मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने त्यांचा ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यास अत्यंत मोलाचा वाटा व सहभाग आहे, ‘ब’ दर्जा प्राप्त होण्यासाठी आवश्यक ती पुर्तता करण्यासाठी ग्रीन स्टोन इंजिनीअरींगच्या आर. एस. महाजन यांनी परिश्रम घेतले आहे.