जळगाव – येथील एस. एस. मणियार विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी सई अनिल जोशी हिची २ ते ८ एप्रिल दरम्यान दक्षिण कोरियाच्या सेऊल येथे आयोजित वुमन एशिया कप सॉफ्टबॉल चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सई जोशी ही या स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळणार आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन फक्त पाच मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यात जळगावच्या सई जोशीसह स्वप्नाली वायदंडे (कोल्हापूर), ऐश्वर्या बोडके (पुणे), श्रद्धा जाधव (लातूर), ऐश्वर्या भास्करन (मुंबई) यांचा समावेश आहे. सई जोशी हिने यापूर्वी चीन, तैवान येथील स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले असून आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत सुवर्ण, सिल्व्हर आणि ब्राँझ मेडल मिळविले आहेत. गत वर्षी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्काराने सई जोशी ला सन्मानित करण्यात आले होते.
सई जोशी ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडच्या मीडिया विभागाचे प्रमुख अनिल जोशी व जळगाव जनता बँकेच्या अधिकारी नीलम जोशी यांची कन्या आहे. तिच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, सॉफ्टबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे सहसचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन करून अभिनंदन केले आहे.