जळगाव (प्रतिनिधी) – नाशिक जिल्ह्यातील नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी नाशिक-जळगाव-शेगाव-पारोळा अशी कठीण “बीआरएम राईड” यशस्वी केल्याबद्दल जळगाव वंजारी युवा संघटनेच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी प्रचंड मेहनतीने आणि संघर्षातून ही “बीआरएम सायकलिंग राईड” पूर्ण केल्याचे सदस्यांनी सांगितले.
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य गणेश कुवर, संचालक अमित घुगे, किरण डोंगरे, सीमा अमित घुगे, मंगेश पाटील, महेश सुतार, सुवर्णा देशमुख, यामिनी नटाळ यांचा सायकलींग राईड पूर्ण करण्यामध्ये समावेश आहे. सुमारे ४०० किलोमीटरची ही “बीआरएम सायकलींग राईड” जळगाव येथून २४ जानेवारी रोजी सकाळी सुरू झाली होती. राईडचा मार्ग जळगाव-शेगाव-जळगाव-पारोळा-जळगाव असा होता.
राईड पूर्ण करण्यासाठी २० तासांचा वेळ दिलेला होता. दिलेल्या वेळेत ही सायकलींग राईड पूर्ण करण्यामध्ये सदस्य यशस्वी झाले. त्याबद्दल वंजारी युवा संघटना, जळगाव जिल्ह्याच्या वतीने त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांच्या अनुभव सांगितले. सायकलमुळे प्रचंड व्यायाम होतो. तसेच आरोग्याच्या दृष्टीने सायकल चालवल्यामुळे प्रचंड फायदा होतो. सायकल चालवण्यामुळे इंधनाची मोठी बचत होते. यामुळे देशाच्या पर्यावरण विकासामध्ये हातभार लावता येतो. तसेच सायकलिंगमुळे आर्थिकदृष्ट्या मोठी बचत करता येते, असेही सायकलिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.
सायकलिंगमध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला असून महिलावर्गानेही सायकल चालवून आरोग्य चांगले ठेवावे असे यावेळी महिला सायकलिस्ट सदस्यांनी सांगितले.
यावेळी नाशिक सायकललिस्ट फाउंडेशनच्या सदस्यांनी राईडविषयी तसेच राईडच्या प्रवासातील अनुभव यावेळी उपस्थितांना सांगितला. राईड दरम्यान थांबे कुठे घ्यायचे, कसे घ्यायचे, सायकल किती वेगाने चालवायची तसेच प्रवासातील सर्व बाबी असं सगळं नियोजन योग्य पद्धतीने झालेलं होतं. अंगात असलेली इच्छाशक्ती आणि राईड करायची दुर्मिळ संधी यामुळे हे यश प्राप्त झालं असेही त्यांनी सांगितले.
यावेळी वंजारी युवा संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव नाईक, सचिव महादू सोनवणे अनिल घुगे चंदुलाल सानप रामेश्वर पाटील यांच्यासह वंजारी समाजातील असंख्य कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.