जळगाव – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून संपूर्ण भारतीयांना राज्यघटना सोपवली होती. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधान प्रत्येक भारतीय नागरीकांचे मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ असल्याचे प्रतिपादन मान्यवरांनी केले.
संविधान दिवस निमित्त शनिवार दि.२६ रोजी नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे संविधान जागृती अभियान राबविण्यात आले. विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्रे प्रशाळा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय संविधान प्रस्ताविकेचे वाचन प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी केले. २६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केल्यावर कार्यक्रमाच्या उदघाटन सत्राला सुरुवात झाली.
नेहरू युवा केंद्र जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांनी प्रास्ताविक करताना संविधानाचे महत्व आणि नेहरू युवा केंद्राच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमात उपस्थितांना कार्यक्रमाच्या उदघाटक न्या.श्रीमती एस.ए.कुलकर्णी यांनी भारतीय राज्यघटना व जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. सामाजिक शास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अजय पाटील, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.सचिन नांद्रे यांनी संबोधित केले. अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा.डॉ.एस.टी.इंगळे यांनी संविधानाच्या तत्वांचे पालन करण्याचे सांगितले. राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.उमेश गोगडीया यांनी आभार व्यक्त केले.
समारोपीय सत्रात जिल्हा सरकारी वकील स्वाती निकम यांनी मूलभूत हक्क व अधिकार यावर, ऍड.जिज्ञाली बडगुजर यांनी संविधानविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे यांनी केले. कार्यक्रमासाठी समाजकार्य विभागाचे डॉ दीपक सोनवणे व नेहरू युवा केंद्र जळगावचे लेखाकार अजिंक्य गवळी, युवा समन्वयक तेजस पाटील, स्वयंसेवक शुभांगी फासे, मुकेश भालेराव, मनोज पाटील, रोहन अवचारे, गौरव वैद्य, हेतल पाटील, नेहा पवार आदींनी परिश्रम घेतले.