जळगाव – जळगाव शहरातील शिवकॉलनीत दारू अड्ड्याजवळ चॉपरने भोसकून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असून अक्षय अजय चव्हाण (वय-२३) असं मृताचं नाव आहे. अक्षयला वाचविण्यासाठी गेलेला त्याचा मित्र युवराज जाधव याच्यावरही चॉपरने वार केल्याने तो गंभीर जखमी आहे. त्याला ही जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोबाईलच्या वादातून हा खून
मोबाईलच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अक्षय हा त्याच्या मित्रांसह घराजवळ गप्पा मारत होता. यादरम्यान दुचाकीवरून तीन ते चार जण आले त्याला कुठलंतरी काम सांगून सोबत घेऊन गेले. यानंतर शिव कॉलनीतील देशी दारूच्या दुकानावर अक्षयचा बाळू पवार नामक तरुणासोबत वाद झाला. या वादातून अक्षयने बाळूच्या भावाला दगड मारुन फेकला. याचा राग आल्याने बाळूने अक्षयच्या पोटात चॉपरने सपासप वार करुन त्याचा खून केला. यावेळी अक्षयच्या सोबत असलेला त्याचा मित्र युवराज मोतीलाल जाधव हा भांडणात पडला, तेव्हा त्याच्यावरही आरोपींनी वार करून त्यालाही जखमी केले.
त्यानंतर बाळूसह मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले. याच ठिकाणी मद्यप्राशन करत असलेल्या भारत बंडू राठोड या तरुणाने जखमी अवस्थेत पडलेल्या अक्षयला जिल्हा रुग्णालयात हलवले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, जखमी युवराज यालाही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मोबाईलवरुन हा वाद झाल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे. मृत अक्षय हा जैन कंपनीत कामाला होता, मात्र तो आज कामावर गेला नव्हता. त्याच्या पश्चात आई रेणुका, वडील अजय भुरा चव्हाण, भाऊ शैलेश असा परिवार आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यावर अक्षय याच्या मित्र परिवारासह नातेवाईक यांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. या प्रकरणात जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील जखमीचे मित्र, मृताचे मित्र मोठ्याप्रमाणात जमल्याने त्यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला. यावेळी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेकर फिरोज शेख तसेच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयसिंग ठाकुरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रीतम पाटील, अविनाश देवरे यांनी जिल्हा रुग्णालय गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.