पाचोरा प्रतिनिधी अनिल आबा येवले – “ज्यांना लायकी व अपेक्षेपेक्षा शिवसेना व मातोश्रीने सतत जास्तीत जास्त दिले परंतु देत असताना त्यांच्या हातातील खंजीर मात्र आम्हाला दिसला नाही. सत्यमेव जयते म्हणत ज्यांनी सत्ता मेव जयतेचा मंत्र जोपासला व पाठीत खंजीर खुपसला. जे उद्धव साहेबांना झाले नाहीत ते तुमचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित करत गद्दारांनो थोडीही लाज व हिंमत असेल तर राजीनामा द्या व या जनतेच्या मतांवर पुन्हा निवडून येऊन दाखवा .”असे खुले आव्हान माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या आमदारांना दिले. पाचोरा येथे शिव संवाद यात्रे निमित्ताने ते बोलत होते.
शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा शनिवार ता 20 रोजी संपन्न झाली. याप्रसंगी अभूतपूर्व गर्दी लोटली. सुमारे साडेतीन तास उशिराने सभा सुरू झाली. उन्हाचे चटके व पावसाच्या सरी अंगावर घेत ठाकरे व मातोश्री प्रेमी मोठ्या संख्येने सभास्थानी बसून होते. व्यासपीठावर वैशाली सूर्यवंशी, स्व आर ओ तात्या यांच्या पत्नी कमल पाटील, गुलाबराव वाघ ,ॲड हर्षल माने,आदेश बांदेकर, दीपकसिंग राजपूत, विष्णू भंगाळे, समाधान पाटील, महापौर जयश्री महाजन, ऍड अभय पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सुनील पाटील, अँड नरेंद्रसिंग सुर्यवंशी, अरुण पाटील, रमेश बाफना,डॉ योगेंद्रसिंग मौर्य, गणेश परदेशी, मनोहर चौधरी ,उद्धव मराठे,लखीचंद पाटील, दत्ता जडे, भरत खंडेलवाल, आनंद संघवी, खंडू सोनवणे, अरुण तांबे ,कांता मराठे, अँड दीपक पाटील ,अजय पाटील, शरद पाटील, दादाभाऊ चौधरी, राजेंद्र साळुंखे ,विजय कावडीया, राजेंद्र गरबड पाटील ,अंजली नाईक (मुंबई), युवासेनेचे सुरज चव्हाण, संदीप जैन, खंडू सोनवणे, अनिल सावंत, पप्पू जाधव, कांताबाई मराठे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. आदित्य ठाकरे येण्याअगोदर शिवसेना संपर्क प्रमुख सुनील पाटिल, रमेश बाफना, अरुण पाटील, गणेश परदेशी, अंजली नाईक, ॲड अभय पाटील यांची भाषणे झाली. यांनी आपल्या मनोगतात स्थानिक आमदारांसह भाजपाच्या कूटनीती वर टिका केली तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या महाराष्ट्र विकासासाठीच्या विधायक कार्याचा लेखाजोखा मांडला. वैशाली सूर्यवंशी यांनी माजी आमदार स्व. आर ओ तात्या पाटील यांच्या कार्याला आठवणींना उजाळा देत त्यांचे विचार, एकनिष्ठता पुढे अबाधित ठेवण्यासाठी सेनेचा धनुष्य पेलला असल्याचे सांगून भविष्यात मदत, सहकार्य व आशीर्वादाचे आवाहन केले.
आपल्या सुमारे 22 मिनिटांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण व जोशपूर्ण मनोगतात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचा सातत्याने गद्दार म्हणून उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 थर लावून दहीहंडी फोडल्याच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी हंडी फोडली, मलाई चाखली गद्दारांना काय मिळाले ? ज्यांनी गद्दारी केली त्या सर्वांना मंत्री पदाची अपेक्षा आहे. त्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होतील का ? हे गद्दारांनी पाहावे. मुख्यमंत्री पद व सत्ता गेल्याचे कधीही दुःख वाटले नाही परंतु ठाकरे कुटुंबीय उद्धव साहेबांच्या आजारपणामुळे अत्यंत भावनिक अवस्थेत असताना गद्दारांनी धीर न देता शिवसेना फोडण्याचे व मुख्यमंत्री होण्याचे कारस्थान रचले. परंतु शिवसेना व मातोश्री गद्दारां कडून संपेल एवढी कमकुवत नाही. तिच्या मागे राज्यातील जनतेचा आशीर्वाद व शुभेच्छा आहेत. शिवसेना फोडण्याचे राजकारण करणाऱ्यांना राज्याचे तुकडे पाडायचे आहेत.अडीच वर्षाच्या काळात महाआघाडी सरकारने जे जनतेच्या हिताचे निर्णय घेतले ते निर्णय बदलवून महाराष्ट्राची अधोगती करण्याचे व राज्यातील जनतेवर अन्याय करण्याचे प्रयत्न चालवले जात आहेत असे सांगून गद्दारांची पहिली बॅच मंत्री बनली आहे. ते आमच्याकडेही मंत्री होते पण आमच्याकडे त्यांना चांगली खाती होती आता कशी खाते मिळाली हे त्यांनीच पहावे.
हिंदुत्वाचा नारा लावणारे कोणते हिंदुत्व जोपासत आहेत हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे. आम्ही गद्दारी नव्हे तर आम्ही बंड, उठाव केलाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी बंड व उठाव करायला ताकद व बळ लागते हा इतिहास पहावा. गद्दारी ही गद्दारीच असते. स्वतःला शिवसैनिक म्हणून घेणाऱ्या गद्दारांना गोवाहाटीला झाडी ,डोंगर व हाटेल दिसले परंतु आसाम मधील पूरग्रस्तांची स्थिती मात्र त्यांना दिसली नाही. ते खरंच शिवसैनिक असते तर त्यांनी पुराच्या पाण्यात उतरून मदत केली असती व लोकांचे जीव वाचवले असते. अशा या गद्दारांचे सरकार तात्पुरते, बेकायदेशीर व घटनाबाह्य आहे हे कोसळणार म्हणजे कोसळणारच असा विश्वास व्यक्त करत गद्दार निर्लज्जपणे खोटे बोलतात. 4, 5 लोकांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा व स्वार्थासाठी त्यांनी गद्दारी केली अशांना तुम्ही आपले लोकप्रतिनिधी मानणार आहात काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला. गद्दारांनी लक्षात घ्यावे शिवसेना अथवा ठाकरे कुटुंबीयांशी ही गद्दारी नाही तर ती माणुसकीशी गद्दारी आहे.
उद्धवजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे नाजूक परिस्थितीत असताना व मी जागतिक पर्यावरण परिषदेसाठी परदेशात गेलो असताना यांनी कूट कारस्थान रचुन गद्दारीचे नियोजन केले .ठाकरे कुटुंबीयांच्या सोबत न राहता उद्धवजींची काळजी न घेता शिवसेना पक्ष फोडण्याचा डाव आखला. या गद्दारांना जनता त्यांची जागा दाखवेल यात मला कोणतीही शंका वाटत नाही. गद्दारांना थोडी जरी लाज व हिंमत असेल तर द्या राजीनामे आणि या निवडून असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी केले. दरम्यान आदित्य ठाकरे यांचे सामनेर (ता पाचोरा)येथे भव्य स्वागत करून सुमारे आठशे दुचाकी रॅलीने पाचोरा येथे आणले गेले. लासगाव, नांद्रा, हडसन,खेडगाव, बिल्दी, गोराडखेडा या गावांजवळ त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून औक्षण करण्यात आले. त्यांच्या समर्थनार्थ गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. पाचोरा शहरातील वरखेडी चौफुलीजवळही स्वागत करून जारगाव चौफूली, महाराणा प्रताप चौकात त्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले .वैशाली सूर्यवंशी यांनी गावाच्या सीमेवरच त्यांचे स्वागत केले. राजे संभाजी चौकात प्रतिमापूजन करण्यात येऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .त्या नंतर शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन करून हुतात्मा स्मारकात जाऊन त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवसंवाद व्यासपीठावर आल्यानंतर त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे ,मीनाताई ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, स्व. आर ओ तात्या पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांना भलामोठा पुष्पगुच्छ देऊन त्यांना राखी बांधली. यावेळी सारेच भावनिक झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. अत्यंत जोशपूर्ण व अभ्यासू मनोगतातून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली व उपस्थितांकडूनच ओके, खोके, गद्दार,ईडी हे शब्द वदवून घेतले. ज्यांनी गद्दारी केली त्यांचे सोबत राहून त्यांचे लोकप्रतिनिधित्व आता स्वीकाराल काय ? याचे उत्तर हात उंचावून द्या असे आवाहन करताच उपस्थितांनी दोन्ही हात वर करून त्यांना साद व दाद दिली. असेच आशीर्वाद व प्रेम कायम असू द्या. त्यामुळे शिवसेनेला एकटे पाडण्याचा कट हाणून पाडता येईल असे सांगून अजूनही ज्यांना गद्दारीचा पश्चाताप होत असेल व आपली चूक वाटत असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले आहेत असे आवाहनही त्यांनी केले.