जळगाव – केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव तर्फे सर्व राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांनी गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची विविध मागण्यांसाठी भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत युवक प्रतिनिधी तेजस पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन ५ हजारावरून १० हजार करावे आणि स्वयंसेवकांना शासकीय प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी होती.
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जळगाव विभागात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यासाठी स्वयंसेवक कार्यरत असतात. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात २ स्वयंसेवक आपली भूमिका बजावतात. संपूर्ण देशभरात राष्ट्रीय युवा स्वयंसेवक त्या त्या जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनासोबत सर्व प्रकारच्या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होत असतात. तसेच युवा, खेळ मंत्रालय मार्फत देण्यात आलेले सर्व कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक गावात, तालुक्यात पोहोचवण्यासाठी झटत असतात. उपक्रमातील ९० टक्के युवक हे ग्रामीण भागातील असतात. ग्रामीण भागातील स्वयंसेवकांना त्यांच्या आयुष्याच्या वळणावर आजच्या महागाईच्या काळात जे मानधन दिले जाते ते न परवडणारे असते. तरी देखील ते मनापासून काम करतात.
कोविड काळात सर्व युवा स्वयंसेवक यांनी जीवाची पर्वा न करता जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सोबत सक्रिय कार्य केलेले आहे. सध्याची महागाई आणि स्वयंसेवकांचे कार्य लक्षात घेता राष्ट्रीय युवा स्वयंसेवकांचे मानधन १० हजार रुपये करण्यात यावे आणि त्यांना केंद्र शासनाच्या इतर सुविधांचा किमान २ वर्ष लाभ मिळावा अशा मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक रोहन अवचारे, हेतल पाटील, संदेश पाटील, चांदणी कोळी, नेहा पवार, मनोज पाटील, कल्पना पाटील, मुकेश भालेराव, राहुल वाघ, आनंदा वाघोडे, राहुल जाधव, पल्लवी तायडे, नेहा पवार, सागर नागने आदी स्वयंसेवक उपस्थित होते.