माळशेवगे – गावातील नळाला दीड महिन्यापासून पाणी येत नसल्यामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. गावातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत मुबलक पाण्याचा साठा असल्यावर सुध्धा पाणी येत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य समोर डोक्यावर हंडा कळशी घेऊन मोर्चा काढत पाण्याची मागणी केली.
तालुक्यातील शेवरी तांड्याला नेहमी उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा भासतो. विहिरीवर असलेल्या मोटारीचे बिल ग्रामपंचायत भरत नसल्यामुळे महावितरण महामंडळाने वीज पुरवठा खंडित केला आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वीज वितरण कंपनी तयार नाही असे समजते. त्यामुळे गावातील नळाला पाणी पुरवठा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
हंडाभर पाण्यासाठी रानात वणवण फिरावे लागत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गेल्या दीड महिन्यापासून गावातील महिलांना आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन डोक्यावर किंवा सायकल, मोटार सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टरवर पाणी आणावे लागत आहे. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व सदस्यांना अनेकदा तोंडी तक्रार करूनही पाणीप्रश्न सुरळीत झाला नसल्यामुळे अखेर महिलांनी हंडा मोर्चा काढला.
गावात बंजारा समाज, भिल्ल (आदिवासी) समाज, व दलीत वस्ती इत्यादी मागासवर्गीय समाज असल्यामुळे त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा सुर निघत आहे. ऊसतोड मजूर गावी आल्यावर नेहमी त्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो तो पाण्याचा ! दरवर्षी एन उन्हाळ्यात शेवरी गावाला पाण्याचा प्रश्नाला सामोरे जावे लागते. अखेर सरपंचपती डिगंबर मोरे यांनी उद्यापासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे महिलांनी तात्पुरता मोर्चा मागे घेतला.