पाचोरा – तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील ८० वर्षीय वृध्द महिलेच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा करण्याचे काम सुरू होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पिप्री बुद्रुक येथील रहिवाशी तेजसबाई पुना जाधव ह्या घरी एकट्याच राहतात. मंगळवारी ३१ मे रोजी सायंकाळी तेजसबाई जाधव ह्या घरी एकट्याच असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर वार करून खून केला. दरम्यान, सायंकाळपर्यंत तेजसबाई जाधव यांच्या घराचे लाईट का लागले नाही असा प्रश्न गावातील नातेवाईकांना पडला. त्यांनी घरात जावून पाहिले असता तेजसबाई यांच्या गळ्यावर विळ्याने वार करून खून केल्याचे निदर्शनास आले. वृध्द महिलेच्या छातीवर विळा पडलेला दिसून आला. याघटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली.
दरम्यान, ८० वर्षीय वृध्द महिलेचा खून का करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात आहे. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी भारत काकडे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले, पाचोरा पोलीस स्टेशनचे किसनराव पाटील यांच्यासह पथक दाखल झाले असून कसून चौकशी सुरू आहे. मयत वृध्द महिलेच्या पश्चात दोन मुले असा परिवार आहे.