जळगाव प्रतिनिधी – प्रेयसीच्या भावाला प्रेमप्रकरणाची माहिती दिल्यामुळे दोघांनी रागाच्या भरात मित्राच्या डोक्यात दगड घातला, चॉपरने वार करून खून केला. ही घटना बुधवारी पहाटे २.३० वाजता रेल्वे मालधक्का परिसरात उघडकीस आली. घटनेनंतर मारेकरी मेहरूण तलाव परिसरात पळून गेले. तेथे त्यांनी तलावात रक्ताने माखलेला चॉपर धुतला.
अनिकेत गणेश गायकवाड (वय २१, रा. राजमालतीनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचेच मित्र सागर बाळू समुद्रे (वय १८, रा. राजमालतीनगर) व सुमीत संजय शेजवळ (वय १८, रा. पिंप्राळा हुडको) यांनी अनिकेतचा खून केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. सागर समुद्रे याचे जळगाव तालुक्यातील एका गावातील मुलीशी प्रेमसंबंध होते. याची माहिती अनिकेतने मुलीच्या भावाला दिली होती. त्यामुळे दोघांमध्ये तणाव सुरू होता. ‘मी तुला मारून टाकेन’ अशी धमकी सागर वारंवार अनिकेतला देत होता.
यातच बुधवारी रात्री अनिकेत, सागर व सुमीत असे तिघे मित्र मालधक्का परिसरात दारू पित बसले होते. याच ठिकाणी दोघांनी अनिकेतवर चॉपरने वार केलेे. नंतर त्याच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून केला. त्यानंतर दोघेजण दुचाकीने मेहरूण तलाव परिसरात पळून गेले. तेथे त्यांनी रक्ताने माखलेला चॉपर तलावाच्या पाण्यात धुतला. दोघेजण तेथे अंधारात लपून बसले होते. तर दुसरीकडे काहींनी मालधक्का परिसरात मृतदेह पाहून शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू केला.
राजमालतीनगरातील अर्जुन धोबी यांना माहिती मिळाल्यानंतर ते अनिकेतच्या घरी गेले. अनिकेतचे वडील व भाऊ असे दोघे घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी ओळख पटवली. यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पथकाने शोध घेण्यास सुरुवात केली.
अनिकेतची कोणाशी मैत्री, शत्रुत्व होते याची माहिती मिळताच बुधवारी रात्री सागर व सुमीत हे तिघे सोबत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. संजय हिवरकर, रवी नरवाडे, संतोष मायकल, प्रमोद वंजारी, राजेंद्र मेंढे, उपनिरीक्षक रवींद्र सोनार, दत्तात्रय पोटो, विजय निकुंभ, उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, गजानन बडगुजर, राजकुमार चव्हाण, कमलेश पाटील, प्रणेश ठाकूर, रतन गिते यांच्या पथकाने रात्रीतूनच सागर व सुमीत या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अटक कली आहे.


