जळगाव – कोरोना पूर्व कालावधीत मिळालेल्या भाविक भक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि त्यांना लाभलेल्या मानसिक समाधानामुळे केशवस्मृती सेवासंस्था समूहाद्वारे यावर्षीही दि. १७ ते २३ एप्रिल २०२२ दरम्यान दुपारी २.३० ते संध्या.६ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात प्रख्यात प्रवचनकार आणि कथावाचक श्री. दादा महाराज जोशी यांच्या अभ्यासपूर्ण शैलीतील “भागवत कथा सप्ताह ” आयोजित करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत मानवी जीवन खूपच व्यस्त, धावपळीचे,ताणतणावाचे आणि स्पर्धेचे झाले आहे. पावलोपावली दिसणाऱ्या स्पर्धेमुळे आपल्या जगण्यातील सहजपणाच संपून जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. आपण इतके व्यस्त झालो आहोत की,स्वतःकडे पाहायलाही आपल्याला वेळ नाही. खरे तर,शिणलेल्या जीवाला दोन घडी विश्रांती हवी असेल तर हवे अध्यात्म आणि आध्यात्मिक वातावरण… तेच या सप्ताहाच्या माध्यमातून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. कोरोनानंतरच्या काळात आपण मुक्तपणे श्वास घ्यावा आणि भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवावा- याकरिता केशवस्मृती सेवा संस्था समूह व श्रीमती नर्मदाबाई रामनारायण कोगटा, दाल परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.
या नियोजनाच्या दृष्टीने व्यासपिठ, बैठक व्यवस्था, प्रसाद वितरण, दररोजजी आरती, यातायात व्यवस्था समिती यांचे गठण करण्यात आले आहे. भाविकांनी या कथेचा लाभ घेण्याचे आवाहन केशवस्मृती सेवा संस्था समूह प्रमुख श्री भरत अमळकर, दाल परिवारचे श्री प्रेम कोगटा यांनी केले आहे.


