जळगाव – ‘जैन समाजाच्या परंपरेत जळगावची विशेष ओळख आहे, ज्या वेगाने प्रगतीकडे मार्गक्रमण सुरू आहे तीच गती कायम राहिल्यास येणाऱ्या पाच वर्षात जळगावचा सकल जैन समाज भारतात अग्रस्थानी असेल याचा मला दृढ विश्वास आहे’, असे बीजेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी प्रतिपादन केले.
शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या निमित्त बालगंधर्व नाट्यगृहात विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सकल संघाचे अध्यक्ष दलीचंदजी जैन, जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, महापौर जयश्री महाजन, आ. राजुमामा भोळे, रमेशदादा जैन, प्रदीप रायसोनी, सुशील बाफना, अजय ललवाणी, स्वरूपचंदजी कोठारी, सौ. कमलादेवी कोठारी, महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वरूप लुंकड, कस्तुरचंद बाफना, ललीत लोढाया, राजेश श्रावगी, माणकचंद बैद मान्यवर उपस्थित होते. आरंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण, ध्वजवंदन, माल्यार्पण व दीपप्रज्ज्वलन झाले.
शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे सकाळी वासूपूज्य मंदिरापासून शहरातील मान्यवरांनी झेंडा दाखविला व महावीर जयंतीच्या औचित्याने भव्य शोभा यात्रा सुरू झाली. या शोभा यात्रेत भगवान महावीर यांचे संदेश असलेले फलक, बेटी बचावो, बेटी पढाओ या सारखे सामाजिक संदेशाचे सादरीकरण, पारंपरिक वेशभूषा, शहरातील स्त्री-पुरूष, युवावर्ग मोठ्या उत्साहाने या शोभायात्रेत सहभागी झालेला होता. ही शोभायात्रा सुभाष चौक मार्गे बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत पोहोचली. या शोभायात्रेचे धार्मिक सभेत रूपांतर झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे, वक्ते राजेंद्र लुंकड यांनी सुसंवाद साधला. जळगावच्या वैभवात ज्यांनी भर घातली त्या स्व. भवरलालजी जैन, स्व. आर.सी. बाफना तसेच सुरेशदादा जैन यांचा आवर्जून उल्लेख केला. जैन समाजातील 16 हजारहून अधिक साधू- साध्वी आहेत, त्यांचे विचार, मार्गदर्शन आणि संस्कार समाजाला मिळतात. परंतु बाह्य वातावरण दूषित झालेले आहे, अशा वातावरणात आपले स्वत्व टिकविणे आवश्यक आहे. आपले चरण हे मनुष्याला मंदिरापर्यंत घेऊन जातात मात्र सत्य, अहिंसा, दया, क्षमा, हे पंचतत्व सिध्दांत मानवाला आत्मकल्याणापर्यंत घेऊन जातात. आचरणातुन समाजात परिवर्तन घडू शकते. आपले संस्कार हाच परिवार आणि धर्म मानत पुढे चालत राहिले पाहिजे. बाहेर असलेल्या दुषित वातावरणातही मुलांना संस्कारासह त्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे ही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भगवान महावीरांच्या विचारांची गरज संपूर्ण जगाला आता अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. या विचारांचे फक्त चिंतन करून भागणार नाही तर प्रत्यक्ष आचरण करण्याची नितांत आवश्यकता आहे, त्यावर मार्गक्रमण करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्याबाबत त्यांनी महात्मा गांधीजींचे उदाहरण दिले. जैन दर्शनमधून महात्मा गांधीजींनी केवळ ‘अहिंसा’ हा एकच शब्द आचरणात घेतला तर ते मोहन ते महात्मा बनले. जगात जर शांतता प्रस्थापित करावयाची असेल तर भगवान महावीर यांच्या विचारांचा अवलंब करणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे युवाशक्तीला महनीय व्यक्तींचा आदर्श समोर असावा. युवकांनी थोर व्यक्तींचे चरित्र वाचावे त्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या चरित्राचा ही त्यांनी उल्लेख केला.
स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या आईचे त्यांनी उदाहरण दिले. स्वामी विवेकानंद अर्थात नरेंद्र विदेशात आपले विचार व्यक्त करण्यासाठी जाणार होते परंतु त्यांच्या आईने त्यांना आशीर्वाद दिलेला नव्हता. आईने नरेंद्रला स्वयंपाल घरातील सुरी आणण्यास सांगितली. नरेंद्रने ती सुरी आणली सुरीची मुठ आईच्या दिशेने व टोकदार भाग स्वतःकडे ठेवला आणि आईने तत्पर नरेंद्रला आशीर्वाद दिला तो अशाकरीता की माझ्या नरेंद्रकडून जे काम होईल ते चांगलेच होईल. या पद्धतीने युवावर्गाने चांगले आचरण करावे असे आवाहनही राजेंद्र लुंकड यांनी आपल्या भाषणात केले. जीवदया संस्कार म्हणून स्वीकारलेला आहे अशा सकल जैन संघाच्या उपक्रमाचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी प्रमुख पाहुणे राजेंद्र लुंकड यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांना देण्यात आलेल्या मानपत्रचे वाचन पुष्पाताई भंडारी यांनी केले.
नम्रता संस्कार हा जैन समाजाचा गुण – गुलाबराव पाटील
पालमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन समाजाचे कौतुक करताना सांगितले की, नम्रता, दातृत्व, कर्तृत्व हा जैन समाजाचा गुण आहे, कोरोनासारख्या संकटात जैन उद्योग समूह व जैन समाजातील मान्यवरांनी गरजूंना भोजनापासुन ते कोवीड सेंटर, उपचारापर्यंत आवश्यक ती मदत केली. आपण दलुभाऊ जैन व श्रद्धेय मोठेभाऊ यांच्याकडून दातृत्व व नम्रता हे संस्कार घेतले असा उल्लेख जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आवर्जून केला.
महोत्सवाचे अध्यक्ष स्वरूप लुंकड यांनी देखील सुसंवाद साधला. आ. सुरेश भोळे यांनी देखील सुसंवाद साधला. पुढली जन्मकल्याणक महोत्सव बंदिस्त बालगंधर्व नाट्यगृहात होईल त्याबाबत पाठपुरावा आपण करू असा शब्द त्यांनी दिला. कोठारी परिवारातर्फे गौतम प्रसादी देण्यात आली त्याबाबत त्यांचा पारिवारित सत्कार देखील करण्यात आला. कोठारी परिवाराच्यावतीने सौ. विमलाजी महेंद्र कोठारी यांनी अत्यंत भावपूर्ण भाषण केले. परिवाराला ज्या महनीय व्यक्तींनी सहकार्य केले, मार्गदर्शन केले त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी तर आभारप्रदर्शन माजी आमदार मनीष जैन यांनी केले.