जळगाव – अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स अकॕडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धा जळगावात सुरू होती. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा प्रेसिडेंट कॉटेज, अजिंठा रोड या रिसॉर्ट येथे पार पडला.
महिला गटामध्ये भारतीय विमानतळ प्राधिकरण संघ १२ गुणांसह प्रथम क्रमांकाने विजयी झाला. तर पुरूष गटामध्ये सुध्दा भारतीय विमानतळ प्राधिकरण संघाला १६ गुणांसह प्रथम क्रमांकाने विजेतेपद मिळाले.सर्व बक्षीस पात्र खेळाडूंना सन्मानचिन्ह व रोख पारितोषिके देऊन सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार विजेते ग्रॅण्ड मास्टर अभिजित कुंटे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदकुमार गादिया, आखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे पंच कमिटीचे चेअरमन धर्मेंद्र कुमार सर, जळगाव एअरपोर्ट अथॉरिटी चे सुनील मग्गरवार साहेब व्यासपिठावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मंगेश गंभीरे यांनी सुत्रसंचालन केले तर नंदकुमार गादिया यांनी प्रास्ताविक केले. अभिजीत कुंटे यांनी स्पर्धेच्या आयोजनाबाबत जळगाव बुध्दिबळ संघटनेचे कौतुक केले. अशोक जैन यांच्या पुढाकारातुनच बुध्दिबळ चा प्रचार प्रसार होत असल्याचे ते म्हणाले. स्पर्धेचे प्रमुख पंच धर्मेंद्र कुमार यांनी स्पर्धेबाबत मनोगत व्यक्त केले. स्पर्धेतील सहभागी पंच अंबरीश जोशी, विनिता क्षोत्री, विवेक सोहनी प्रवीण ठाकरे, अजिंक्य पिंगळे, मंगेश गंभीरे, दीप्ती शिदोरे, अफ्रिन देशपांडे, आकाश धनगर, नंदकिशोर यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व एम पी एल फाउंडेशन व जैन इरिगेशन चे चेअरमन अशोक जैन यांनी स्विकारले होते. स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे झाली. महिला गटात 11 संघ, पुरूष गटात 22 संघ सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धेकांना सुमारे दहा लाखांचे रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
महिला गट
महिला गटामध्ये भारतीय विमान प्राधिकरणाचा संघ सर्व सामने जिंकत १२ गुणांसह प्रथम क्रमांकाने विजयी झाला. पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ १० गुणांसह द्वितीय तर महाराष्ट्र अ संघाला ८ गुणांसह तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले आंध्रप्रदेश (७ गुण), महाराष्ट्र क संघ (७ गुण) , राजस्थान अ संघ (६ गुण), गुजरात ( ६ गुण), बिहार अ संघ (६ गुण), ओडीसा संघ (४ गुण), हिमाचलय प्रदेश ब संघ (5 गुण)असे पहिले दहा विजयी संघ आहेत रोख पारितोषिके व सन्मानचिन्हे देऊन गौरविण्यात आहे. या व्यतिरिक्त महिला गटातील आपापल्या पटांवर सर्वोच्च गुण प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना देखील गौरविण्यात आहे. पहिल्या पटात पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघाची सौम्या सोमनाथन ५ गुण (गोल्ड), महाराष्ट्राची भाग्यश्री पाटील ४.५ गुण, भारतीय विमानतळ महासंघाची अर्पिता मुखर्जी ३ गुणांनी विजयी झाले.तर दुसऱ्या पटावर साक्षी चितलांगे, दिव्या देशमुख, मेरी गोम्स पहिले तीन पदके, तिसऱ्या पटावर ईशा करवाडे, प्रियंका नुटाक्की आणि प्रणाली धारिया यांनी अनुक्रमे पहिले तीन पदके तर चौथ्या पटावर वैशाली आर,मोहता निशा,विश्वा शहा यांनी सुवर्ण, रजत आणि कास्य तर पाचव्या पटावर के प्रियंका, मोनीका बोम्मीनी हे विजयी ठरले.
पुरूष गट
पुरूष गटामध्ये शेवटपर्यंत काट्याची टक्कर पहावयास मिळाली विमानतळ प्राधिकरण, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन अ संघ व रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन ब संघ या तीनही संघांची गुण संख्या एकसमान झाल्याने टायब्रेकर्सच्या निकषांद्वारे भारतीय विमान प्राधिकरण संघाला विजयी घोषित करण्यात आले. रेल्वे स्पोर्टस प्रमोशन बोर्ड अ संघ १६ गुणांसह द्वितीय स्थानावर राहिला तर , रेल्वे स्पोर्टस प्रोमोशन बोर्ड ब संघाला तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. तमिळनाडू अ संघ ११ गुणासह चवथ्या तर एलआयसी आॕफ इंडिया च्या संघाला १० गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले, बिहार अ संघाला १० गुणांसह , राजस्थान अ संघाला १० गुणांसह आणि आंध्रा संघाला अनुक्रमे सहाव्या, सातव्या व आठव्या स्थानी समाधान मानावे लागले, राजस्थान ब संघ ९ गुण तर बिहार ब संघ ९ गुणांमुळे अनुक्रमे नवव्या व दहाव्या स्थानी राहिले.
महिला व पुरूष या दोन्हीही संघातील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम – 1 लाख 25 हजार, द्वितीय – 1 लाख, तृतीय – 75 हजार, चतुर्थ – 60 हजार, पाचवे –
50 हजार, सहावे – 30 हजार तर सातवे आणि आठवे – 20 हजार व नववे व दहावे 10 हजाराच्या रोख पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.
पुरुष गटांतील पहिल्या पटावरील विजेत्यांमध्ये विगनेश एन आर, क्रिष्णा सी आर व अरविंद चितांबरम् यांनी सुवर्ण,रजत व कास्य पदके पटकावली तर दुसऱ्या पटावर सायांतन दास, दीपन चक्रवती, अभिमन्यु पुराणिक यांनी पहिले तीन क्रमांक घेतले, तिसऱ्या पटावर स्वप्नील धोपाडे, हर्षा बाराकोट्टी, श्रीराम झा यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक प्राप्त झाले तर चवथ्या पटावर संकल्प गुप्ता, आर.आर लक्ष्मण, विसाख एन आर यांनी सुवर्ण, रजत व कास्य घेतले तर शेवटच्या ,पाचव्या पटावर ऋत्विक राजा , श्यामनिखील पी व तेजकुमार एम एस यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळवले, या सर्व विजेत्यांना मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सर्व पदाधिकारी, जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे सर्व सहाय्यक, रवी धर्माधिकारी, अंकुश रक्ताडे, प्रवीण ठाकरे, नंदलाल गादिया, सी एस देशमुख, किशोर सिंह आदींनी परिश्रम घेतले.