चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील शेवरी येथे गेल्या ५ वर्षापासून गावविकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या माळशेवगा गृप ग्रामपंचायती मधील शेवरी गाव अजूनही मुलभुत विकासापासून कोसो दूर आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शेवरी गावातील भिल्ल (आदिवासी), दलीत व बंजारा समाजाच्या अशिक्षित व गरीब लोकांना अजूनही वाटते की आता तरी पंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांना कीव येईल आणि ते थोडेफार तरी आमचे जगणे सोयीस्कर करतील.
पण “निर्लज्जम् सदा सुखी” या समिकरणावर चालणाऱ्या प्रशासनाला या निषेधाने काहीच फरक पडणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. अद्यापही इथले रस्ते, गटारी, स्वच्छ पाणी यापासून गावकरी वंचित आहेत. ग्रामपंचायतीला यासाठी लाखो रुपयांनी निधी शासनामार्फत पुरवला जातो. पण तो पैसा फक्त बँकेतील खात्याची शोभा वाढवतो की काय असा प्रश्न ग्रामस्थांना आहे. त्यामुळे गावातील जनता आता त्रस्त झाली आहे. सध्या वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांची भर आपण झालेली पाहतोय.
त्यात कोरोना सारख्या महामारीने मनात भीती निर्माण केली आहे. मग निदान ग्रामपंचायतीने शेवरीतील उग्रवासाने व गढूळ पाण्याने व घाणीने तुडुंब भरलेल्या गटारी तरी काढाव्यात अशी प्रचंड मागणी होत आहे. गटारी कधी साफ झाल्या हे सांगणे अवघड आहे.यामुळे घाणीचे साम्राज्य,दुर्गंधी,डास,मच्छर,माशा इ.मुळे रोगराई कायमच पाचिला पुजलेली असते. अगोदरच गावात कुठलीच आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे आरोग्य सांभाळावे तरी कसे असा प्रश्न निर्माण होतो ? गेल्या महिन्यातच या संदर्भात गावातील लोकांनी ग्रामसेवकांना या अडचणी समजावून सांगितल्या देखील. पण त्याने काहीच फायदा झाला नाही. मग या गोरगरीब जनतेने गावविकासाची “भिक” मागावी तरी कोणाकडे ?
ग्रामपंचायतीकडे तसेच वेळोवेळी ग्रामपंचायत सदस्यांनाही याविषयी मागणी केली तरी देखील नेहमी प्रमाणे पदरात निराशाच पडली. त्यामुळे आज शेवरीतील महिलांनी स्वतः हातात तगारी, पावडी घेत अनेक दिवसांपासून गावातील तुडुंब भरलेल्या गटारी गांधीगिरी करत स्वतःच काढायला सुरुवात केली. झोपेचे सोंग घेतलेल्या ग्रामपंचायतीला जाग करण्यासाठी त्यांच्या या कामगिरीने प्रशासनाच्या चांगलीच थोबाडीत हाणली आहे. ग्रामपंचायतीने निदान आता तरी गावात काही विकासकामांकडे लक्ष द्यावे हीच त्यांची मागणी आहे.