जळगाव – केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्रातर्फे आयोजित केला जाणारा तिसरा राष्ट्रीय युवा संसद उत्सव २०२१-२२ मार्चमध्ये होणार आहे. तत्पूर्वी ७ जिल्ह्यांचा जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम दि.२२ रोजी ऑनलाईन पध्दतीने जळगावात घेण्यात आला. विजयी स्पर्धक राज्यस्तरीय युवा संसदेत सहभागी होतील.
जळगाव नेहरू युवा केंद्राचे कार्य लक्षात घेता यंदाचा राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम आयोजित करण्याचा मान जळगाव केंद्राला देण्यात आला आहे. दि.२५ फेब्रुवारी रोजी आयएमआर महाविद्यालयातून ऑनलाईन पद्धतीने युवा संसद स्पर्धा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी ७ जिल्ह्यांची ऑनलाईन युवा संसद मंगळवारी नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा.डॉ.सचिन नांद्रे यांनी युवा संसदचे उदघाटन केले. यावेळी परीक्षक म्हणून डॉ.उमेश गोगडीया, डॉ.सुधीर पाटील, हर्षल पाटील, प्रा.संदीपकुमार केदार, मनोज गोविंदवार यांनी काम पाहिले. तसेच लेखापाल अजिंक्य गवळी, स्वयंसेवक रोहन अवचारे, गौरव वैद्य, तुषार साळवे यांनी परिश्रम घेतले.
युवांच्या नेतृत्व आणि वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवा संसद उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. आज जळगाव, परभणी, बुलढाणा, हिंगोली, अमरावती, वाशिम आणि अकोला जिल्ह्यासाठी युवा संसद घेण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील १० स्पर्धकांना संधी देण्यात आली होती. त्यात स्पर्धकांनी इंक्रेडीबल इंडिया, आयुष्यमान भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, स्किल इंडिया, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत, स्वस्थ भारत या विषयावर ४ मिनिटात आपले वक्तृत्व सादर केले.
प्रत्येक जिल्ह्यातून २ विजयी स्पर्धकांची निवड करण्यात आली. त्यात जळगाव – प्रथम सारांश धनंजय सोनार, द्वितीय सायली गणेश महाजन, हिंगोली –
प्रथम वैष्णवी कैलास सातव, द्वितीय चेतन परमेश्वर साठे, अमरावती – प्रथम करण मधुसूदन पारेख, द्वितीय श्रेया मनीष शेळके, वाशिम – प्रथम सौरव महादेव घाडगे, द्वितीय युवराज रंगराव राठोड, परभणी प्रथम प्रतिभा प्रसाद मुरूबकर, द्वितीय पल्लवी मनोहर शिंदे, बुलढाणा – प्रथम सलोनी संजय त्रिवेदी, द्वितीय आसमाबी कलीम शहा, अकोला – प्रथम साक्षी दीपक पवार, द्वितीय आकाश पंजाबराव काळे यांचा समावेश आहे. विजयी स्पर्धक दि.२५ फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. नेहरू युवा केंद्राचे महाराष्ट्र व गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय युवा संसद घेण्यात येणार असून स्पर्धेत राज्यभरातील खासदार, आमदार देखील ऑनलाईन पध्दतीने सहभागी होणार आहे.