जळगाव प्रतिनिधी । डॉ. अश्वीन सोनवणे यांच्या राजीनाम्यानंतर उपमहापौरपदासाठी भाजपामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच महापालिकेच्या उपमहापौरपदासाठी निवड प्रक्रिया जाहीर झाली आहे. नगरसेवक सुनील खडके यांची या पदावर वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.उपमहापौरपदासाठी सुनील खडकेंच्या नावाची चर्चा.
पक्षातील वरिष्ठांनी सांगितल्यानंतर अलीकडेच डॉ. अश्वीन सोनवणे यांनी राजीनामा दिला होता. त्यातच पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर महापालिकेत लक्ष घातल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. असे असताना उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
दिवाळी आधीच निवड
दिवाळीची सुरवात होण्याआधीच महापालिकेच्या उपमहापौर पदा तिढा सुटणार आहे. दि. ११ नोव्हेंबर ला जिल्हाधिकारी तथा पिठासीन अधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन झाले आहे. यात उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया राबविली जाईल.
उपमहापौरपदासाठी ५ ते ९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुटीचे दिवस वगळता नामनिर्देशनपत्र मिळतील. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. ११ ला सभा सुरू झाल्यानंतर छाननी करून माघारीसाठी पंधरा मिनिटांचा कालावधी असेल यानंतर उपमहापौरपदाची निवड होणार आहे.
भविष्यातील परिणाम टाळण्यासाठी सुनील खडकेंना संधी?
उपमहापौर पदासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु या पदावर सुनील वामनराव खडके यांची वर्णी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यांना राजकीय वारसा देखील असून ते माजी विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांचे चिरंजीव आहेत. एकनाथराव खडसे यांनी भाजपचा त्याग केल्यानंतर जळगाव महापालिकेत लेवा पाटीदार समाजाला कोणतेही पद नसल्याने भविष्यात अडचणी येऊ नये यासाठीच सुनील खडके यांना संधी देऊन लेवा समाजाला महापालिकेत उपमहापौरपदाची संधी देण्यात येऊ शकते तशी घोषणा लवकर भाजपातील वरिष्ठ करतील असे सूत्रांकडून समजते.
अजून वाचा
जळगाव महापालिकेची राजकीय समीकरणे बदलू शकतात का ?