इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून गुरुवारी रंगणाऱ्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन बलाढय़ संघ १३व्या पर्वाच्या अंतिम फेरीत मजल मारण्यासाठी उत्सुक आहेत.IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!.
चार वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने १४पैकी ९ सामने जिंकत १८ गुणांनिशी गुणतालिकेवर वर्चस्व गाजवले. मात्र अखेरच्या सामन्यात त्यांना सनरायजर्स हैदराबादकडून १० गडी राखून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचा आत्मविश्वास काहीसा डळमळीत झाला आहे. पहिलेवहिले जेतेपद पटकावण्यासाठी आतुर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने सलगच्या चार पराभवांनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुला सहा गडी राखून पराभूत करत आपली गाडी रुळावर आणली आहे. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले आहे.IPL 2020 : अंतिम फेरीसाठीची झुंज!.
कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन ही मुंबईसाठी जमेची बाजू आहे. मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे रोहितला चार सामन्यांना मुकावे लागले होते. पण सनरायजर्सविरुद्ध त्याला अपेक्षित पुनरागमन करता आले नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर गतविजेता मुंबईचा संघ सक्षम आहे. मात्र सनरायजर्सविरुद्ध मुंबईची फलंदाजी ढेपाळली होती. त्यामुळे दिल्लीविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात मुंबईला कामगिरी उंचवावी लागणार आहे.
गोलंदाजीत कॅगिसो रबाडा (२५ बळी) आणि आनरिख नॉर्किया (१९ बळी) या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे प्रतिस्पर्धी फलंदाजावर वर्चस्व गाजवण्यात काहीसे यशस्वी ठरले आहेत. साखळी फेरीत मुंबईने दोन्ही वेळेला दिल्लीला हरवले आहे. त्यामुळे या सामन्यातही मुंबईचेच पारडे जड मानले जात आहे.
* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या.
अजून वाचा
रोहित शर्माने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय जोखीम पत्करू नये!