जायबंदी रोहित शर्माने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याशिवाय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) बाद फेरीतील लढतींमध्ये खेळण्याची जोखीम पत्करू नये. त्याला कारकीर्दीत अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा असून भविष्याच्या दृष्टीने त्याने निर्णय घ्यावा, अशी सूचना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने केली आहे.
मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ३३ वर्षीय रोहितला ‘आयपीएल’मधील किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत डाव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर रोहित अद्याप एकही सामना खेळलेला नसला तरी बाद फेरीतील लढतींसाठी तो संघात परतणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहितला या दुखापतीमुळेच भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीच्या संघातूनही वगळण्यात आले आहे.
‘‘रोहित सध्या दुखापतग्रस्त आहे. अन्यथा त्याच्यासारख्या खेळाडूला विनाकारण संघातून वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तो भारताच्या मर्यादित षटकांच्या सामन्यासाठीचा उपकर्णधार असण्याबरोबरच प्रत्येक प्रकारात महत्त्वपूर्ण फलंदाज आहे,’’ असे ४८ वर्षीय गांगुली म्हणाला.
काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित सराव करतानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर टाकली होती. त्यासंबंधी गांगुली म्हणाला, ‘‘रोहित हा एक परिपक्व खेळाडू असून आपल्यासाठी काय योग्य आहे, याची त्याला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे १०० टक्के तंदुरुस्त असल्याशिवाय त्याने ‘आयपीएल’च्या बाद फेरीच्या लढतीत खेळू नये. कारण सामन्यादरम्यान पुन्हा त्याच्या मांडीचे स्नायू ताणले जाण्याची भीती असल्यामुळे त्याला किमान काही आठवडे अथवा महिन्याभरासाठी संघातून बाहेर बसावे लागू शकते.’’
भारतीय तसेच मुंबई इंडियन्सचे फिजिओ रोहितच्या तंदुरुस्तीकडे नजर ठेवून असून त्याला अद्याप कारकीर्दीत अनेक शिखरे सर करायची असल्यामुळे तो लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानावर परतेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला. त्याशिवाय इशांत शर्माच्या तंदुरुस्तीत सुधारणा होत असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी तो उपलब्ध असण्याची शक्यता बळावली आहे, याकडेही गांगुलीने लक्ष वेधले.