जळगाव, प्रतिनिधी । आज दिनांक 27 रोजी नारीशक्ती ग्रुप जळगाव व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
विविध वृत्तपत्राने लक्ष्मी शिवदास मोरे हिच्या प्रेरणादायी कार्याची नुकतीच दखल घेतलेली बातमी वाचून अध्यक्षा मनीषा पाटील यांनी लक्ष्मीच्या कार्याबाबत चौकशी केली असता तिच्याकडून समजले की शासकीय आयटीआय महाविद्यालय शेजारी रस्त्यावर लाकडाच्या बेट चेंडूफळ्या बनवून उदरनिर्वाह चालवणारे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील मोरे कुटुंबातील कन्या नववीत शिकणारी लक्ष्मी शिवदास मोरे ही प्रेरणादायी ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. अशावेळी श्रीमंत मुलांना स्मार्टफोन उपलब्ध होतात परंतु गरीब मुलांकडे असे काही साधन नसते. अशावेळी लक्ष्मीने ही बाब जाणून या कुटुंबातील 20 मुलांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. शैक्षणिक कार्यासाठी तिला काही शैक्षणिक साधनांची आवश्यकता होती ती साधने नारीशक्ति ग्रुप व जायेंट्स ग्रूप ऑफ जळगाव तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वाटप करण्यात आली. अशा या सावित्रीच्या लेकीसाठी नारीशक्ती धावली.
अध्यक्षा मनीषा पाटील यांनी सांगितले की जोपर्यंत ही कुटुंब येथे वास्तव्यास आहे तोपर्यंत लक्ष्मीला लागणाऱ्या शैक्षणिक वस्तू तिला पुरवल्या जातील. तसेच नारीशक्ती ने लक्ष्मी च्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी देखील उचलली आहे या प्रसंगी मनीषा पाटील,ज्योती राणे, नूतन तासखेडकर, भावना चव्हाण, माधुरी शिंपी,पुष्पा पाटील या उपस्थित होत्या.