जळगाव, प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्र संघटन जळगाव जिल्हा प्रशासन जळगावतर्फे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने आज यावल तहसील कार्यालय स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ परिसराचे आयोजन करण्यात आले होते. अभियानाच्या उदघाटनप्रसंगी उदघाटक रक्षाताई खडसे यांनी स्वतः सक्रिय सहभाग नोंदवित कचरा संकलन देखील केले.
स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून यावल येथे करण्यात आली. खा.रक्षाताई खडसे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात झाली. प्रसंगी प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार महेश पवार, पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती उपसभापती श्री.भंगाळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा रक्षाताई खडसे म्हणाल्या की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्लीन इंडिया उपक्रम सुरु केला आहे. जळगाव जिल्ह्यात जिल्हा प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिनाभर सर्वांनी प्लास्टिकचा वापर करू नये, कोणालाही प्लास्टिक देऊ नये आणि प्लास्टिक घेऊ नये असा संदेश या माध्यमातून दिला जात आहे. आपण देशाचे नागरिक म्हणून क्लीन इंडिया, स्वच्छ भारत अभियान प्रत्येकाने राबविणे आवश्यक आहे. केवळ महिनाभर नव्हे तर नेहमीच सर्वांनी प्लास्टिकमुक्त परिसर ठेवून स्वच्छता ठेवावी, असे आवाहन खा.रक्षाताई खडसे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना युवा अधिकारी नरेंद्र डागर म्हणाले कि, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानात १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांनी महिनाभर प्लास्टिक उपवास पाळत प्लास्टिकचा वापर टाळणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात प्रत्येकाने विशेषतः तरुणांनी सहभाग नोंदवित नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांना सोबत घेऊन स्वच्छ भारत मोहीम यशस्वी करावी असे आवाहन डागर यांनी केले.
खा.रक्षाताई खडसे यांनी पुढे सांगितले कि, तरुणांनी घर आणि परिसरातील स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी स्वत: तसेच इतरांना प्रेरीत करुन स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे. स्वच्छतेविषयी जागृतता निर्माण करावी. स्वच्छता अभियानात युवा तसेच नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.
प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी, जिल्ह्यातील नागरिकांनी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करून प्लास्टिकमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येकाने सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी केले.
यावल येथून सुरु झालेले स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यातील अधिकाधिक गावांमध्ये राबविले जाणार असून कचरा संकलन आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे.