मुंबई – २६/११ हा दिवस मुंबईकरांसह संपूर्ण देशवासियांच्या लक्षात राहणार दिवस आहे. याच दिवशी मुंबईवर काही दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत शेकडो निष्पाप लोकांचे जीव घेतले होते. त्याचबरोबर मुंबई पोलीस आणि लष्करातील अधिकाऱ्यांची देखील हत्या केली होती. मुंबई पोलीस आणि भारतीय लष्करातील जवानांनी देखील या दहशतवाद्यांना जशा तसे उत्तर देत त्यांना यमसदनी धाडले. त्यातील एका दहशतवाद्याला जीवंत पकडण्यात त्यांना यश देखील आले. त्याच क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशीच्या तख्तावर पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ओह माय गॉड, १०२ नॉट आउट सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या कथेचे काम पूर्ण झाले असून लवकरच चित्रपटातील कलाकारांची निवड करण्यात येणार आहे. उमेश शुक्लांचे सध्या डीडीएलजे आणि आँख मिचोली हे दोन चित्रपट तयार होत आहेत. उमेश यांचा या चित्रपटांनंतर पुढील चित्रपट निकम यांच्यावर आधारित बायोपिक असणार आहे. निकम असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.
या चित्रपटाचे अधिकार बॉम्बे फेबल्स आणि मेरी गो राउंड स्टुडिओज यांनी विकत घेतले आहेत. या चित्रपटाची पटकथा राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक भावेश मंडालिया आणि गौरव शुक्ला यांनी लिहिली आहे. या चित्रपटावर निकम यांनी सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवली असून एका चांगल्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव तसेच या कथेपासून लोकांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अजून वाचा
ज्येष्ठ गायक आणि संगीतज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन