जळगाव – सोमवारी सायंकाळी कानळदा रोडवर शतपावली करणाऱ्या व्यापाऱ्याला अज्ञात दोन जणांनी चाकूने धाक दाखवून अंगावरील सोन्याच्या वस्तू आणि ८० हजाराची रोकड लूट केल्याची घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
महेंद्रकुमार लक्ष्मीनारायण मंडोरे (वय-६४) रा. नवीपेठ जळगाव हे व्यावसायाने व्यापारी आहेत. दररोज ते सायंकाळी कानळदा रोडवर शतपावली करण्यासाठी जातात. नेहमीप्रमाणे सोमवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी १८.१५ वाजेच्या सुमारास कानळदा रोड, तुरखेडा शिवारातील ईदूमोती टेक्स फेंब प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसमोरी रस्त्याजवळ दोन अनोळखी व्यक्ती महेंद्र मांडोरे यांच्या समोर उभे राहिले.
यावर महेंद्र यांनी हटकले असता यातील एकाने महेंद्र यांच्या पोटाला चाकूचा धाक दाखवत शर्टाच्या खिश्यातील ८० हजार आणि गळ्यातील १ लाख ५७ हजार रूपये किंमतीची ६३ ग्रॅमची ब्रेसलेट, १ लाख ३७ हजार रूपये किंमतीची ५५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि १५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण ४ लाख १२ हजार ५०० रूपयांची लुट केली. महेंद्रकुमार मंडोरे यांनी तत्काळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कादिर तडवी करीत आहे.