पुणे, वृत्तसंस्था । मुंबई, पुण्यासह आज राज्यभरात गणरायाचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलं. कोरोनाचे नियम पाळून सार्वजनिक मंडळांमध्ये आणि घरोघरी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यातील प्रसिध्द श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला एका भक्तानं तब्बल 10 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. सध्या पुण्यासह संपूर्ण राज्यात या 10 किलो सोन्याच्या मुकुटाची चर्चा सुरू आहे. या सोन्याच्या मुकुटाची किंमत सुमारे 6 कोटी रुपये इतकी आहे. सोन्याचा मुकूट बाप्पाचरणी देणाऱ्याचं नाव मात्र मंदिर प्रशासनानं गुपित ठेवलंय.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं ट्रस्टच्या 129व्या वर्षी सकाळी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. त्यानंतर हा 10 किलो सोन्याचा मुकूट बाप्पाला घालण्यात आला.
ऑनलाईन आरतीची सुविधा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून बाप्पाला 21 किलो महाभोग अर्पण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. कोरोना विषाणूमुळे मंदिरांमध्ये कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रातही अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. गणेश चतुर्थी दरम्यान लोकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.