जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशा सह इतर अनेक कलावंतांचे कार्यक्रम बंद आहेत. सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीने दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तमाशासह इतर अनेक कलावंताचे कार्यक्रम, रोजगार बंद आहेत. त्यामुळे कलावंतांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून काही जणांनी आत्महत्या केल्या आहेत. सर्व प्रकारच्या लोकवंतांच्या कार्यक्रमांना परवानगी द्या. अन्यथा लोकवंत रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा महारा÷ष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे राज्य प्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी दिला.
जय महाकाली कलावंत ग्रुपतर्फे आयोजित महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीतर्फे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय एक दिवसीय कार्यशाळा शिरसोलीत झाली. याप्रसंगी गायकवाड बोलत होते. व्यासपीठावर समितीचे राज्य कार्याध्यक्ष सुजीत औताने, विनोद ढगे, प्रदेश उपाध्यक्ष शाहीर प्रेमसागर कांबळे, प्रदेश महासचिव गणेश अमृतकर आदी उपस्थित होते.
शासन, प्रशासन स्तरावर राष्ट्रीय कार्यक्रमांची अंमलबजावणी आदी कार्यक्रम, उपक्रमांच्या जनजागृतीसाठी लोककलावंतांना रोजगाराची संधी मिळते. मात्र, कोरोनामुळे कार्यक्रम बंद आहे. तमाशा, लग्न समारंभात बँड पथक, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांना सुद्धा परवानगी नाही. अशा प्रकारे असंख्य कलावंत बेरोजगार झाले असून त्यांच्यासह कुटुंबाची उपासमार होत आहे. या लोककलावंतांना स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना परवानगी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी समितीची जळगाव जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर झाली. यात जिल्हाप्रमुख प्रशांत कोठावदे, तर कार्याध्यक्षपदी ऋषिकेश येवले यांची नियुक्ती झाली आहे. या वेळी शितल खलसे, वैशाली चव्हाण, अनिता अस्वार आदी उपस्थित होते.
कलावंतांना मिळाले व्यासपीठ
वही गायन, वाघ्या मुरळी, गोंधळी, पोतराज, शाहीर, तमाशा व इतर पारंपरिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीची स्थापना झाली आहे, असे गणेश अमृतकर यांनी सांगितले. सुजित औताने, लोकशाहीर प्रेमसागर कांबळे, उत्तमराव अंबीलढगे, देवराम हरणे, विनोद ढगे, बबनभाई शेख, नवनाथ शिंदे आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत राज्यातील 30 जिल्हामधील प्रमुख सहभागी झाले होते. त्यांनी जिल्हा पातळीवर संघटन बांधणी करताना येणार्या अडचणी, कलावंताचा प्रतिसाद याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ खिल्लारे यांनी केले. तर आभार अमृतकर यांनी मानले.