जळगाव, प्रतिनिधी । गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांच्या ‘कृषी हवामान शास्त्राची ओळख’ आणि स्वत:चा जीवनप्रवास वर्णन केलेल्या ‘श्रमवल्ली’ पुस्तकाचे सोमवारी सायंकाळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
आयुष्यात आलेल्या चढ-उतारांवर मात करत आपले आयुष्य समृद्ध करण्यासाठी केलेली वाटचालीचे हे पुस्तक तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही डॉ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.एस.एस.पाटील, डॉ.कैलास वाघ, डॉ. शैलेश तायडे, डॉ.कुशल डहाके, डॉ.पी.आर.सपकाळे, यशोदिप पवार, देवरे आदि उपस्थीत होते. यावेळी उपस्थीत मान्यवरांनी डॉ.एस.एम.पाटील यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सदस्य डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रकृती स्वास्थ्यासाठी नियमित चाला – डॉ.उल्हास पाटील
यावेळी डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ.एस.एम.पाटील यांच्याबद्दल माहिती दिली, वयाच्या 73 वर्षीसुद्धा त्यांचा कामातील उत्साह हा वाखाण्याजोगा असून दररोज सर्वांच्या आधी 4 किलोमीटरचा मॉर्निंग वॉक घेणे हे त्या मागाचे रहस्य आहे, तसेच त्यांची स्वयंशिस्त, आत्मविश्वास हे सर्व त्यांच्याकडून शिकण्यासारखे असून सरांच्या मार्गदर्शनाखाली शिकून घ्या आणि मोठे व्हा, प्रकृती चांगली राहण्यासाठी नियमित चाला, उत्कृष्ठ शेतकरी शिक्षक बनण्यासाठी शेतात जा… कल्पना सुचवा आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो मात्र त्यावर मात कशी करायची हे शिकून घ्या त्यासाठी डॉ.एस.एम.पाटील यांचे पुस्तकं प्रेरणादायी ठरतील असे आवाहनही डॉ.उल्हास पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ.एस.एम.पाटील यांनी उत्कर्ष होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करा, कामाची गोडी लावून घ्या, उद्दीष्ट्यं ठरवा आणि त्यानुसार आयुष्य जगा असे आवाहन यावेळी डॉ.एस.एम.पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सुरुवातीला पुष्पगुच्छ देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले, पुस्तक प्रकाशनाप्रसंगी डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते डॉ.एस.एम.पाटील यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. पुस्तक प्रकाशन सोहळा आणि तिथीनुसार वाढदिवस हा डॉ.एस.एम.पाटील यांचा एकाच दिवशी आल्याने उपस्थीतांनी त्यांना दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्यात, केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मोनिका नाफडे-भावसार यांनी तर आभार प्रा.मयूरी देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी सहकार्य केले.