जळगाव, प्रतिनिधी । सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाउंडेशनतर्फे वटपौर्णिमानिमित्त वड वृक्षाचे पूजन करीत व वडाचे रोप देऊन वटपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.
दादावाडी परिसरात श्रीराम नगर येथे वृक्षाचा विसावा वाढदिवसही या निमित्त साजरा करण्यात आला. शुद्ध पर्यावरण (ऑक्सिजन) विना सजीव सृष्टी मृतप्राय होऊ शकते. याकरिता वृक्षरोपणासह वृक्ष संगोपन काळाची गरज असल्याने आपल्या परिवारातील सदस्यांसारखे काळजीने वृक्ष संगोपन केल्यास येणाऱ्या काळात मुबलक ऑक्सिजन मिळून सजीव सृष्टी आनंदात राहू शकते. असे मत मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी मुक्ती फाउंडेशनतर्फे वड रोप वाटप करण्यात आले. तर मुकुंद गोसावी यांनी आपल्या पत्नीचा वड रोप देऊन सन्मान केला व वडाचे रोपनही आनंदात केले.