चाळीसगाव – ग्रामीण भागाच्या विकासासाठी राज्य सरकार असो वा केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे.आज स्वतःचे घर मिळत असल्याचा आनंद या बेघर असलेल्या समाज बांधवांच्या चेहऱ्यावर आहे. बऱ्याचदा घरकुल मंजुरीची प्रक्रिया लाभार्थ्याला माहीत नसल्याने तसेच ऑनलाईन प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने अनेक संधीसाधू लोक लाभार्थ्यांची लुबाडणूक करतात त्यामुळे अनेक गोरगरीब लाभार्थी शासनाच्या लाभापासून वंचीत राहतात. त्यामुळे अधिकारी आणि लाभार्थी यांच्यात योग्य समन्वय निर्माण होणे आवश्यक आहे .
लोकांना या योजनेची माहिती देणे त्या मधून लाभ घेण्याच्या शासकीय प्रक्रिया समजावून सांगणे आवश्यक आहे. म्हणून गोरगरीब जनतेला शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी आपण ग्रामीण योजनांचा दूत व्हावे. आणि शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात. असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले.
आज चाळीसगाव पंचायत समिती येथे महाविकास अभियान ग्रामीण यंत्रणा, ग्रामीण विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष यांच्यावतीने ई- गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, माजी सभापती संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब खंडू जाधव, माजी प.स. सदस्य कारभारी पवार, जिभाऊ पाटील, सर्वोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश करपे, पाटणा गावाचे सरपंच नितिन चौधरी,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी रोहिदास सोनवणे, सुरेश गायकवाड, अनिल गायकवाड, विजय गायकवाड, धरमसिंग पवार या पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या हक्काच्या घराची चावीची प्रतिकृती खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.
यावेळी राज्य सरकारचा ऑनलाईन कार्यक्रमाचा लाभ देखील उपस्थित लाभार्थ्यांना घेतला. सुरुवातीला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी या योजनेमुळे लाभार्थ्यांच्या जीवनातील बदल होत असुन आज त्यांना हक्काच्या घराची चावी मिळत असल्याने हा क्षण आनंददायी आहे. असे सांगत कुठल्याही लाभार्थ्यांची अडवणूक न होता मंजूर लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वितरित केले जाईल. चाळीसगाव तालुक्यात सर्वात अधिक लाभार्थ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील असून आपल्या सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन बिडिओ वाळेकर यांनी केले.
यावेळी माजी सभापती संजय पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आमदारकी काळात मागील पाच वर्षात झपाट्याने काम करीत तालुक्याचा सर्वांगीण विकास केला. गोरगरीब जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी समाधान शिबिर, शासकीय योजनांची जत्रा भरून लाखो लोकांना लाभ देण्याची मोठी परंपरा या तालुक्याला घालून दिली.आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असो वा शेकडो रूग्णांना जीवनदान देणारे महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर असो त्यांच्या विकासाचा झंझावात पाहिल्यानंतर आमच्यासारखे पदाधिकाऱ्यांची मान देखील अभिमानाने उंच होत असून त्यांच्या शुभहस्ते लाभार्थ्यांना ई-गृह प्रवेशाची चावी प्रदान होत असल्याचा आनंद असल्याची भावना माजी सभापती संजय पाटील यांनी व्यक्त केली.
खा. उन्मेशदादा पाटील पुढे म्हणाले की गटविकास अधिकारी वाळेकर हे अतिशय कार्यतत्पर आणि अभ्यासू असुन पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेवटच्या घटकाला लाभ मिळण्यासाठी झटत आहेत. आज उपस्थीत गोरगरीब जनतेच्या चेहर्यावरील घर मिळाल्याचा आनंद हा देवदुर्लभ प्रसंग असून केंद्र आणि राज्याच्या योजनेतून चाळीसगाव तालुक्यात सहा हजार पेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यापैकी 4235 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. अधिकाऱ्यांनी तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी मदत करण्याची गरज असून लाभार्थ्यांनी देखील आपल्याला मिळालेला पैसा हा घर बांधताना शौचालय देखील बांधून 100% उपभोग घ्यावा. लाभ मिळवून देण्यासाठी सर्व उपस्थितांनी ग्रामीण योजनांचा दूत बनून गोरगरीब जनतेला मदत व सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पंचायत समितीचे सहाय्यक बिडिओ अजित पवार, किरण मालाजंगम, मनोहर गांगुर्डे, विस्तार अधिकारी आर.आर. पाटील , के.एन.माळी, दिगंबर शिर्के, माजी सरपंच गोरख राठोड, राजुभाऊ पगार, बंडूदादा पगार, बबडी शेख,माजी सरपंच अभिमन्यू शास्त्री, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन,माजी सरपंच रवीआबा राजपूत, समकित छाजेड, राकेश कोतकर , कैलास गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.