जळगाव – रात्रीची वेळ… पावसामुळे तारा मोठ्या प्रमाणात तुटून वीज पुरवठा खंडित… अशावेळी विज सुरळीत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी पोहोचतात… मात्र अडथळा कायम…झाडावर असणारे मधमाशांचे पोळे तसेच पाऊस… अशा सर्व परिस्थितीत कर्तव्याची पूर्तता करून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज पुरवठा तब्बल दोन तास अथक परिश्रम करून सुरळीत केला. याबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
घटना घडली ती जळगाव शहरात एम.जे.कॉलेज मागील लक्ष्मीनगर येथे. या ठिकाणी संध्याकाळी मुसळधार पाऊस पडल्यानंतर ७.३० वाजेच्या सुमारास स्नेहा अपार्टमेंट लगतच्या कडूनिंबाच्या झाडाजवळ विजेच्या वायर तुटून पडल्याचे नागरिकांना दिसले. यामुळे परिसरात सर्वत्र घरातील विज देखील गायब झाली होती. नागरिकांनी महावितरण कार्यालयात दूरध्वनीवरून तक्रार केली.
महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होऊन तुटलेल्या तारा व परिसराची तपासणी केली. यावेळी कडुनिंबाच्या झाडाच्या काही फांद्यांचा अडसर होता. तसेच या झाडावर मधमाशांचे पोळे देखील होते. अशावेळी विजेच्या खांबावर काम करणे हे जोखमीचे काम होते. परिसरातील नागरिकांनी या प्रभाग क्रमांक १२ च्या नगरसेवकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. या वेळी परिसरातील रहिवासी मनोज वारके यांनी त्यांच्या कामावरील जेसीबी मागवून ते महावितरणच्या कर्मचाऱ्यांना आणून दिले. महावितरणचे मुख्य अभियंता विवेक चौधरी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करण्यासाठी सुरुवात केली. तब्बल दोन तास जेसीबीच्या सहाय्याने महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत व मधाच्या पोळ्याला धक्का न लागू देता धोका पत्करत विजतारा जोडणे व इतर त्रुट्या दुरुस्त केल्या. त्यानंतर काही वेळाने परिसरात वीज पुरवठा सुरळीत झाला.
वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंता विवेक चौधरी, राजेंद्र कुमावत, विशाल तिवणे, दिवाकर असणे, सचिन जाधव, कपिल पाटील आदि कर्मचाऱ्यानी प्रयत्न केले. प्रसंगी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
…तर पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावली असती
लक्ष्मी नगरच्या या भागांमध्ये बुधवारी पहाटे अडीच ते पाच या वेळात पाणीपुरवठा करण्याची महापालिकेची वेळ होती. येथील बहुतांश नागरिक हे पाण्याची मोटार लावून पाणी भरीत असतात. जर वीज पुरवठा सुरळीत झाला नसता तर वीज नसल्याने अनेक घरांमध्ये पाणी भरले गेले नसते. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या या परिसरात भेडसावली असती. या भागामध्ये तीन दिवसआड पिण्याचे पाणी मिळत असते. मात्र महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतत दोन तास, न थांबता वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रशंसनीय काम केल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी देखील भरायला मिळाले. याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त करीत महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.