जळगाव – वैद्यकीय सेवेमध्ये परिचारिकांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. परिचारिकांनी व्यावसायिक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट होण्याची आज गरज आहे असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थी परिचारिकांचा व्यवसाय प्रतिज्ञा तसेच प्रवेशाचा कार्यक्रम शनिवार पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण मुंढे बोलत होते. मंचावर जिल्हा शल्यचिकित्सक नागोराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिसेविका कविता नेतकर, प्राचार्या अनिता भालेराव उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. चव्हाण यांनी, परिचारिकांनी प्रतिज्ञेतील शब्द हे सेवेच्या वेळेस अंमलबजावणीमध्ये येऊ द्या अशी सूचना करीत शैक्षणिक प्रगतीसाठी अपडेट राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच शैक्षणिक प्रगतीचा आढावा देखील घेतला. यावेळी कविता नेतकर यांनी मार्गदर्शन केले.
डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले की, रुग्णालयात येणारा रुग्ण हा आजारामुळे त्रासलेला असतो. तेव्हा त्याला आपुलकीने सेवा देणं खूप गरजेचे असते. रुग्णाला धीर देऊन बरे करण्यामध्ये डॉक्टरांसह परिचारिकांचे योगदान खूप मोठे असते. यासाठी परिचारिकांनी संवेदनशील असायला पाहिजे असेही ते म्हणाले.
प्रस्तावना प्राचार्या भालेराव यांनी केली. सूत्रसंचालन विद्यार्थिनी पल्लवी धांडे, नेहा पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी परिचारिका उपस्थित होते.