जळगाव – धुळे महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविकांना शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये.म्हणून कोरोनासंबंधीत कामे (उदा.घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करणे,रुग्ण शोधणे,बाधित व्यक्तीला संदर्भ सेवा देणे, रुग्णांची दैनंदिन माहिती ठेवणे, नागरिकांची ऑक्सिजन पातळी आणि ताप तपासणे आदी ) आशाताईंना महापालिका प्रशासनाने दिली होती.
सदर कामे करत असतांना हेमलता बर्गे या आशाताईंना कोरोनाची बाधा झाली होती आणि दि.७ एप्रिल २०२१ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कुटूंबातील कर्ता व्यक्ति गेल्याने कौटुंबिक आणि आर्थिक हानी झाली.
सामाजिक बांधिलकी म्हणून सुभराऊ फाऊंडेशन,अमळनेरने पुढाकार घेत कोरोनाने बाधित होऊन म्रुत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि आशाताईंच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी असे विविध क्षेत्रातील दात्यांना आणि अंगणवाडी कर्मचारी तसेच आशाताईंना आवाहन केले होते.
आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेकांनी आप आपल्या परीने यथाशक्ती आर्थिक मदत फाऊंडेशनकडे पाठवली.जमा झालेल्या रकमेतून मयत हेमलता बर्गे यांच्या कुटुंबीयांना पाच हजार रूपयांच्या मदतीचा धनादेश सुभराऊ फाऊंडेशनचे अध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील( अमळनेर) यांच्या हस्ते शाम बर्गे,वनिता बर्गे यांच्याकडे सुपुर्द केला.याप्रसंगी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील आशाताईं उपस्थित होत्या.